देवधानोरा येथील
तरुणाचे अपहरण
कळंब : तालुक्यातील देवधानोरा येथील २९ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला असून, अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची फिर्याद शिराढोण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. अमोल मनोहर काळे (वय २९, रा. देवधानोरा, ता. कळंब) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास देवधानोरा येथून अचानक बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने त्यांना अज्ञात कारणावरून गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची फिर्याद त्यांचे भाऊ मनोहर मलाप्पा काळे यांनी दिली. त्यावरून शिराढोण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.................
गर्दीचा गैरफायदा घेत
५५ ग्रॅमचे दागिने लंपास
उमरगा : येथील बसस्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजोटी (ता. उमरगा) येथील अब्दुल लतीफ अब्दुल करीम शेख (वय ६०) हे मुलीसोबत ५ नोव्हेंबरला दुपारी दीडच्या सुमारास बसस्थानकावर होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या मुलीच्या पर्सची चेन उघडून ४३ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी शेख यांनी १२ नोव्हेंबरला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
..............
डिकसळचा तरुण बेपत्ता;
अपहरणाचा गुन्हा दाखल
कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील एकतानगर परिसरातील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची फिर्याद त्याचा भाऊ धनंजय बाबूराव फकीर यांनी कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. संदीप बाबूराव फकीर (वय ३२) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा ४ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास हैदराबाद येथे फिरायला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला तो परतला नाही. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण करून बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.