‘हायवा’ ठरताहेत ‘हैवान’,झाल्टा ते पाचोड रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चालत असलेल्या एकाही हायवा वाहनाला नंबरप्लेट दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या हायवाने उडविले, हे अपघात बघणाऱ्यांनादेखील समजत नाही.
hyva
hyvaSakal

मुनाफ शेख

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील झाल्टा फाटा ते पाचोड या ४० किलोमीटरच्या अंतरात झालेल्या विविध अपघातांमध्ये विनानंबरप्लेट बेदरकार धावणारे ‘हायवा’ निरपराध नागरिकांचे बळी घेणारे ‘हैवान’ ठरत आहेत. जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत या हायवा वाहनांनी ११ जणांचा जीव घेतला असून, २८ जणांना कायमचे अपंगत्व आणले आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर हायवाचालक घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून वाहनासह पसार झाले आहेत.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चालत असलेल्या एकाही हायवा वाहनाला नंबरप्लेट दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या हायवाने उडविले, हे अपघात बघणाऱ्यांनादेखील समजत नाही. शहागड, विहामांडवा, पैठण, नांदर, दावरवाडी, घारेगाव व सांजखेडा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक व ठिकठिकाणी सुरू असलेल्या भरतीच्या कामासाठी मुरूम तर बांधकामासाठी खडीने भरलेले शेकडो हायवा ट्रक दररोज रात्रंदिवस धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ताशी १२० ते १६० च्या वेगाने धावतात. त्यामुळे महामार्गावर हायवाच्या धडकेने अपघातांच्या संख्येत वाढ झाली.

महसूल विभागाचाही ‘हात’भार

बहुतांश हायवा ट्रक हे अवैध वाळू व मुरमाची तस्करी करण्यासाठीच वापरले जातात. छत्रपती संभाजीनगर तालुका आणि पैठण तालुक्यातील महसूल विभाग या वाळूमाफियांकडे का दुर्लक्ष करतात, हे एक न उलगडणारे कोडे आहे. महसूल विभागाशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवल्याशिवाय अवैध वाळू उपसा करणे शक्य नसल्याने एक प्रकारे या महामार्गावर होणाऱ्या अपघातांना महसूल विभागही तितकाच जबाबदार असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहे.

नियम धाब्यावर ठेवून भरधाव धावतात हायवा ट्रक

विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाने ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहन चालवावे, असा नियम असताना या नियमाचे हायवाचालक सर्रास उल्लंघन करत आहेत. छत्रपती संभाजीनगर, चिकलठाणा, करमाड, पाचोड, एमआयडीसी चिकलठाणा, गोंदी, पैठण पोलिसांसह महामार्ग पोलिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलिस यांच्या नाकावर टिच्चून विनानंबरप्लेट असलेले हायवा ट्रक राजरोसपणे भरधाव धावताना दिसतात.

hyva
Lok Sabha Election 2024: चला मतदान करू या, समृद्ध भारत घडवू या

या भागात घेतले निरपराधींचे बळी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर फाटा, झाल्टा फाटा, निपाणी फाटा, भालगाव फाटा, चित्तेपिंपळगाव उड्डाणपुलाजवळ, कचनेर फाटा, पिंपळगाव, पांढरी, आडूळ बायपास, रजापूर, थापटी, दाभरुळ, आडगाव, जामखेड फाटा, पाचोडसह मुरमा फाट्याजवळ हायवांनी चार महिन्यांत ११ जणांचे बळी घेतले असून, २८ जणांना कायमचे अपंगत्व आणले आहे.

‘हायवा’ का धावतात बेदरकार?

हायवाचालकांना गौणखनिजाच्या जेवढ्या जास्त खेपा होतील, तेवढा जास्त पगार मिळतो. त्यामुळे पैशांच्या लालसेपोटी चालक हायवा सुसाट पळवितात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com