प्रशासकीय गतिमानता अभियानात सहभागी व्हावे
परभणी, ता. ८ : प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि निर्णयक्षम करण्यासह सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२६-२७ जिल्ह्यातील सर्व विभाग व सर्व स्तरांवर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी केले आहे.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी एस. व्ही. गिणगिणे, उपविभागीय अभियंता ज्ञा. बा. चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी. आर. मोकळे, सहायक निबंधक रविराज तायडे, कृषी उपसंचालक एस. ए. जाधवर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अभियानांतर्गत सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता, धोरणात्मक सेवांची अंमलबजावणी, ई-ऑफिसची प्रभावी अंमलबजावणी, ऑनलाइन पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, संसाधनांचा पर्यायी वापर, तंटा-तक्रारमुक्त कार्यालय, नावीन्यपूर्ण व पथदर्शी संकल्पना, प्रयोग व उपक्रम तसेच ई-पंचनामा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग या बाबींचा विचार करण्यात येणार आहे. वैयक्तिक स्तरावर उत्कृष्ट काम करणारे कर्मचारीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अभियानातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (https://pragatiabhiyan.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर सादर करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. स्पर्धेसाठी विचारात घेण्यात येणारा कालावधी २० ऑगस्टपासून एक वर्षाचा राहणार आहे. मात्र, प्रशासकीय सुधारणांशी संबंधित प्रस्ताव, कल्पना व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी कालावधीची अट लागू राहणार नाही. अभियानाच्या कालावधीत महसूल अभियान, पंचायतराज अभियान, इंद्रधनुष्य अभियान आदी इतर उपक्रमही त्यांच्या मूळ स्वरूपात सुरू राहतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी सांगितले.