प्रशासक काळातील कामांची जि. प. काढणार श्वेतपत्रिका
---
सदस्यांच्या मागणीनंतर झालेली आणि प्रलंबित कामे जाहीर करण्याचे अध्यक्षांचे आदेश
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय काळात मागील चार वर्षांत विविध विभागांमार्फत केलेल्या कामांची, योजनांची आणि प्रलंबित कामांची विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी प्रशासनाला १५ दिवसांत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.
शिवसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य संजय निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे आणि भाजपचे रतन बत्तीसे यांनी हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. मागील २० जूनच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य राधाकिसन पठाडे यांनी ठराव क्रमांक २४ मांडला होता. प्रशासक काळात राबविलेल्या विविध योजना व उपक्रमांची तालुका आणि गावनिहाय माहिती एकत्रित करून ती प्रसिद्ध करण्याची मागणी या ठरावातून केली होती. हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष गलांडे यांनी शुक्रवारी (ता. ११) झालेल्या बैठकीत संबंधित विभागप्रमुखांना १५ दिवसांची मुदत दिली. प्रत्येक विभागाने प्रशासक काळात किती कामे झाली, किती कामे प्रलंबित आहेत, किती निधी खर्च झाला आणि कोणत्या योजना राबविण्यात आल्या, याची माहिती व्यवस्थित संकलित करावी, असे निर्देश देण्यात आले.
---
लेखाजोखा सार्वजनिक होणार?
श्वेतपत्रिका जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यासोबतच स्थायी समितीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही टाकण्याचे आदेश देण्यात आले. पाणीपुरवठा, टँकर, ग्रामपंचायत, शाळा दुरुस्ती, सिंचन तसेच अन्य विभागांच्या कामांची माहिती पारदर्शकपणे मांडण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे प्रशासक काळातील कामांचा लेखाजोखा आता सार्वजनिक होईल, अशी अपेक्षा आहे.