औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक थेट टाकीवर

अनियमितता आढळल्याने तीन अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
आस्तिककुमार पांडेय यांनी पाण्याच्या टाकीची अचानक पाहणी केली.
आस्तिककुमार पांडेय यांनी पाण्याच्या टाकीची अचानक पाहणी केली.Sakal

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. पण त्यानंतरही नागरिकांचे पाण्याविना हाल सुरूच आहेत. काही भागात चार दिवसाआड तर काही भागात थेट आठव्या-नवव्या दिवशी नळाला पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहेत. प्रशासक श्री. पांडेय यांनी बुधवारी (ता. २०) थेट सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. याठिकाणी टॅंकरच्या रेकॉर्डमध्ये त्रुटी असल्याचे, टॅंकर भरताना पाणी वाया जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असल्याने त्यांनी उपअभियंता किरण धांडे, के. एम. फालक व अशोक पद्मे यांना कारणे दाखवा नोटिसा बजवण्याचे आदेश दिले.

शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरूच आहे. विशेषतः सिडको-हडकोतील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सिडको एन -५ येथील पाण्याच्या टाकीवर श्री. पांडेय यांनी पाहणी केली. थेट प्रशासक पाण्याच्या टाकीवर आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना फुटला घाम फुटला. प्रशासकांनी कंट्रोल रूममधील रजिस्टर व कागदपत्रांची तपासणी केली. त्यात त्रुटी आढळून आल्या पण अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. टॅंकर भरत असताना होणारी पाणी गळती थांबवा व पाईप तात्काळ दुरुस्त करा, एक लीटर पाणी वाया जाता कामा नये, नियमांचे पालन करा, काही भागात दोन दिवसाआड, तीन दिवसाआड तर काही ठिकणी चार दिवसाआड असे नियोजन न करता सर्व ठिकाणचे वेळापत्रक सारखेच ठेवा. सात दिवसात नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करा, टँकरला व्हीटीएस व जीपीएस रिडर कॅमेरे बसवा, पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश यावेळी पांडेय यांनी दिले. सूचनांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

प्रशासकांना पाणीपुरवठ्याचा फलक दिसून आला नाही. रजिस्टरमध्ये त्रुटी आढळल्या. त्यांनी स्वतः उभे राहून टँकरमध्ये पाणी भरून घेतले. त्यावेळी फिलिंग पॉइंटमधून पाणी वाया जात असल्याचे निदर्शनात आले. पाणी वाया जात असताना उपाय-योजना का केल्या नाही? असा जाब त्यांना अधिकाऱ्यांना विचारला. उत्तर देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

या अधिकाऱ्यांना नोटिसा

कामात निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, फिल्डवर न जाणे, महापालिकेची प्रतिमा मलिन होण्यासारखी कृती करणे आदी बाबी निदर्शनास आल्याने श्री. पांडेय यांनी उपअभियंता किरण धांडे, के. एम. फलक व अशोक पद्मे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, स्मार्ट सिटीचे प्रकल्पाधिकारी फैय्याज अली, कनिष्ठ अभियंता मानकापे, श्री. चौधरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com