कन्नड तालुक्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस, पिकांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

कन्नड तालुक्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस, पिकांना जीवदान

कन्नड (जि.औरंगाबाद) : तालुक्यात (Kannad) महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने चिंतेतील शेतकऱ्यांची प्रतीक्षा मंगळवारी (ता.१७) पहाटे संपली. मंगळवार पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस पडल्यानंतर पावसात पहिल्यांदा मोठा खंड पडला होता. त्यानंतर ता.८ जुलै रोजी झालेल्या पावसाने कोवळ्या खरीप पिकांना जीवनदान मिळाले. त्यानंतर पुन्हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसात खंड पडला होता. एकाच हंगामात पावसाने (Rain) दोनदा मोठी उघडीप दिल्याने शेतकरी (Farmer) चिंतेत होता. मात्र आता पुन्हा पावसाचे पुरागमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. प्रत्यक्षात १४ जूननतंर पावसामध्ये खंड पडल्याने खरीप पेरण्यात रखडल्या होत्या. १४ जून व २८ जून या दोन टप्प्यात कापूस, मका, तूर, सोयाबीन या खरीप पिकांची पेरणी तालुक्यात (Aurangabad) झाली होती. त्यानंतर दमदार व मोठ्या स्वरूपाचा पाऊस नसल्याने दुबार व तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते.

हेही वाचा: कोविड हाॅस्पिटलमध्ये मिळेना जेवण, आष्टीत रुग्ण रात्रभर उपाशी

त्यातील सुटका झालेले शेतकरी आता पुन्हा अडचणीत सापडले होते. दरम्यान आतापर्यंत कन्नड तालुक्यात सरासरी ४९४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र तरीही तालुक्यातील धरणे व तलावात पाणी पातळी वाढलेली नाही. मागील वर्षीच्या प्रचंड पावसाने तालुक्यातील सर्व धरणे ओसंडून वाहत होते. परंतु या वर्षी यात वाढ झालेली नसून आता पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील प्रकल्पात पाणीसाठा वाढण्याची शेतकऱ्यांची आशा आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दोनदा दडी दिल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे निंदणी, कोळपणी, आंतरमशागतीचे कामे आटोपली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना या कामासाठी मजुरांची टंचाई भासलेली नाही.

हेही वाचा: शासनाने निर्णय घ्यावा!अन्यथा शाळा सुरु करु, हरिभाऊ बागडेंचा इशारा

कन्नड तालुक्यातील आठ महसूल मंडळात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ७४.७५ मिलीमीटर झालेला असून मंडळनिहाय झालेला पाऊस मिलिमिटरमध्ये व कंसातील आकडे आतापर्यंत पडलेला पाऊस

१) कन्नड : ११५ (५३५)

२) चापानेर : ४५ (४८८)

३) देवगाव रं. : ५० (४६९)

४) चिकलठाण : ८० (३१४)

५) पिशोर : ५९ (५०८)

६) नाचनवेल : ७६ (४६९)

७) करंजखेडा : ९२ (५३२)

८) चिंचोली : ८१ (६४०)

एकूण पाऊस-३९५६,सरासरी- ४९४.५ मिलिमीटर.

टॅग्स :rain