शासनाने निर्णय घ्यावा!अन्यथा शाळा सुरु करु, हरिभाऊ बागडेंचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिभाऊ बागडे

शासनाने निर्णय घ्यावा!अन्यथा शाळा सुरु करु, हरिभाऊ बागडेंचा इशारा

औरंगाबाद : शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने नियमावली तयार करुन शाळा सुरु कराव्यात. अन्यथा सोमवारपासून (ता.२३) स्वनियमावली तयार करुन औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग एकाच दिवशी सुरु करण्यात येतील, असा इशारा भाजपचे (BJP) आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे (MLA Haribhau Bagade) यांनी गुरुवारी (ता.१९) पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला आहे. शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी Governor Bhagat Singh Koshyari), शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भाजपकडून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: पाच चविष्ट मिठाई, सोपे अन् झटपट घरच्या घरी बनवा

मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग सक्तीने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरिब, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने जरी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवले असले, तरी मोबाईलसह अन्य तांत्रिक अडचणीमुळे गरिबांची मुलं ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. अनेक मुलं शाळाबाह्य होत असून बालविवाहाचे प्रमाण देखील वाढले आहे. अद्याप अनेक जिल्ह्यात मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणच करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये तातडीने सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा. १७ तारखेला शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

हेही वाचा: उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

किमान गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांचे वर्ग सुरु करा

१८ महिन्यांपासून ग्रामीणसह शहरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. या वयात योग्य शिक्षण न मिळाल्यास संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. अनेक विद्यार्थी मला येऊन भेटतात, त्यांच देखील म्हणणे आहे की लवकर शाळा लवकर सुरु कराव्यात. शाळा सुरु न केल्यास विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होईल. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेसह एका बॅचवर एक विद्यार्थी या प्रमाणे मुलांना शाळेत बोलवावे. गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे तीन विषयांचे तरी वर्ग तरी सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, किंवा परवानगी नाकारली असे कळविण्यात यावे. अन्यथा येत्या २३ ऑगस्टपासून स्वनियामवली तयार करुन राज्यभरात एकाच दिवशी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येतील, असा इशारा श्री.बागडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

टॅग्स :haribhau bagade