esakal | 'अनुदान पाहिजे तर दीड लाख द्या', लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

बोलून बातमी शोधा

bribe in Aurangabad

'अनुदान पाहिजे तर दीड लाख द्या', लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: सीताफळाच्या बागेसाठी शासनाकडून मंजूर केलेल्या अनुदानाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून एक लाख ४५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या गंगापूरच्या कृषी सहाय्यकास आणि त्याला मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (ता.२७) पकडले. रविंद्र वांडेकर असे लाचखोर कृषी सहाय्यकाचे नाव आहे. तर किशोर कांडेकर असे त्याला मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीचे नाव आहे.

गंगापूर तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याने सीताफळाच्या बागेसाठी महाराष्ट्र शासन प्रमाणित फळबाग अनुदान घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केला होता. शासनाने तक्रारदार शेतकऱ्याला सीताफळाच्या बागेसाठी अनुदान मंजूर केले होते. दरम्यान, गंगापूर तालुक्यातील जांभाळा येथील कृषी सहाय्यक रविंद्र वांडेकर यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे मंजूर केलेल्या अनुदानाचा मोबदला म्हणून एक लाख ४५ हजार रूपये लाच देण्याची मागणी २६ एप्रिल रोजी केली होती.

हेही वाचा: चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसबीकडे तक्रार दिली होती. एसीबीचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, अंमलदार बाळासाहेब राठोड, अशोक नागरगोजे, रविंद्र काळे, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून लाच घेणाऱ्या रविंद्र वांडेकर, आणि मदत करणाऱ्या किशोर कांडेकर या दोघांना धुळे सोलापूर रस्त्यावरील फतीयाबाद (ता. गंगापूर) परिसरातील राजपूताना हॉटेल समोरुन ताब्यात घेतले. दोघां संशयितांविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.