नांदेडमध्ये दिवाळीनिमित्त ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’
२७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान आयोजन ः कपडे, दागिन्यांसह विविध वस्तूंचे स्टॉल
नांदेड, ता. २३ : स्थानिक व्यावसायिक, महिला उद्योजक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनासह विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने नांदेडमध्ये ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ दिवाळी मेळ्याचे आयोजन केले आहे. हा मेळा २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान चैतन्यनगर येथील सौभद्र मंगल कार्यालयात होणार आहे.
या उपक्रमासाठी मित्रांण इव्हेन्ट ॲण्ड मॅनेजमेंट यांचे सहकार्य लाभणार आहे. मेळ्यामध्ये कपडे, दागिने, फॅशनविषयक वस्तू, हस्तकला, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ यांसह विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. महिला उद्योजक, लघुव्यावसायिक आणि घरगुती उत्पादनांची निर्मिती करणाऱ्यांना आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनाही एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करता येईल.
स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करणे, ग्राहकांशी थेट संपर्क वाढविणे आणि व्यवसायवृद्धीला चालना देणे हा मेळ्याचा उद्देश आहे. मेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्टॉलधारकाला अमृत संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
---
स्टॉल नोंदणी सुरू
मेळ्यात सहभागी होण्यासाठी स्टॉल नोंदणी सुरू असून, एका स्टॉलसाठी २ हजार ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक व्यावसायिकांनी स्टॉल आरक्षण व अधिक माहितीसाठी ७३९१०६५४७२, ८६००२४००३२ किंवा ९४२२८७४३४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
नांदेडमधील नागरिकांनी दिवाळी मेळ्याला भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
----