चिंताग्रस्त चेहरे अन् अस्वस्थता | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेबर कॉलनी

औरंगाबाद : चिंताग्रस्त चेहरे अन् अस्वस्थता

औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनीतील ३३८ घरे रिकामी करून पाडापाडीला केव्हाही सुरवात होऊ शकते. त्यामुळे या वसाहतीमधील रहिवाशांची अस्वस्थता वाढत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंता अन् अस्वस्थतेचे वातावरण आहे. येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवारी (ता. १२) चौथा दिवस होता.

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी कारवाईबाबत अंतिम बैठक होईल आणि मंगळवारी लेबर कॉलनीवर बुलडोझर चालविण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनीतील रहिवाशांना शासकीय निवासस्थान वाटपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिलेल्या मुदतीपर्यंत येथील १८३ रहिवाशांनी पुराव्यांसह अर्ज सादर केले आहेत. तर दुसरीकडे चार दिवसांपासून लेबर कॉलनी बचाव संघर्ष समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करण्यात येत आहे. घरे वाचवण्यासाठी रहिवाशांकडून जोरदार प्रयत्न सुरू केले जात आहेत. दिवस निघाला की आलटून पालटून साखळी उपोषणात सहभागी होणे हा इथल्या रहिवाशांचा गेल्या चार दिवसांपासून दिनक्रम सुरू आहे.

हेही वाचा: समाजवादी परफ्यूमला भ्रष्टाचाराची दुर्गंधी

रहिवाशांचे केले समुपदेशन

जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनीतील शासकीय घरे पाडण्याची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेच्या पूर्वनियोजनासाठी शुक्रवारी (दि. १२) निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, मनपा, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पार पडली. मोहीम कशी राबवावी याबाबत शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांच्या सूचनेवरून सायंकाळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, महापालिका उपायुक्त रवींद्र निकम, कनिष्ठ अभियंता जोशी या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने लेबर कॉलनीत रहिवाशांना समजाऊन सांगितले. कारवाई तर होणार आहेच, त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी रविवारपर्यंत सामान काढून घ्या, असे समुपदेशन केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाडापाडी मोहिमेत मोठा फौजफाटा

शुक्रवारी झालेल्या पूर्वनियोजनाच्या बैठकीत लेबर कॉलनीत ५०० पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १० पेक्षा अधिक जेसीबी, घरे पाडल्यानंतर मलबा उचलण्यासाठी ट्रक, अशी विविध तयारीचे नियोजन करण्यात आले असून याची सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा: दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना अंशत; परत

रविवारीही बैठक

विश्वासनगर लेबर कॉलनीतील धोकादायक इमारतीबाबत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, पोलिस विभागासह संबंधित विविध शासकीय विभागांचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे हदगल यांनी सांगितले.

loading image
go to top