भाजप तालुकाध्यक्षावर पत्रकार
संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पाथरी, ता.११ (बातमीदार)ः वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून ज्येष्ठ पत्रकार किरण घुंबरे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था संरक्षण कायद्यांतर्गत शनिवारी (ता.१०) रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे तालुकाध्यक्ष स्वराज प्रल्हाद घुंबरे, अमोल केशव घुंबरे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध घालणाऱ्या या कायद्यांतर्गत कारवाई झाल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील वाघाळा येथील रहिवासी किरण घुंबरे हे मागील ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी वाघाळा येथील रोपवाटिकेत बोगस मजूर दाखवून ९२ हजार रुपयांचा अपहार झाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीच्या रागातून ७ ऑक्टोबर रोजी पाथरी वाघाळा रस्त्यावरील चाटे पिंपळगाव पाटीजवळ स्वराज घुंबरे याने स्कूटी अडवून हेल्मेटने मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या अमोल घुंबरे यानेही मारहाण केल्याचा आरोप आहे. स्वराज याने लोखंडी रॉडने कंबर व पाठीवर मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी किरण घुंबरे यांचा मुलगा कार्तिक यालाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. जखमी पत्रकार किरण घुंबरे यांच्यावर पाथरी व परभणी येथील शासकीय रुग्णालयांत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शनिवारी (ता. दहा) रोजी पाथरी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणातील आरोपी स्वराज घुंबरे भाजपचा पाथरी तालुकाध्यक्ष आहे. विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध करत पत्रकारांवरील हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. दरम्यान, पत्रकारावरील हल्ल्याच्या या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
--------------