
सिडको-हडकोला दिलासा; जुन्या शहरात पाणीबाणी
औरंगाबाद : शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाय-योजना केल्यानंतर नवीन शहराला म्हणजेच सिडको-हडकोला काहीसा दिलासा मिळाला आहे. या भागात पाच दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवसी पाणी येत आहे. असे असले तरी दुसरीकडे जुन्या शहरात पाण्याची ओरड सुरू झाली आहे. आठ दिवसानंतरही नळाला पाणी आले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागात आठ-नऊ दिवसानंतर नळाला पाणी येत असल्याने नागरिक आंदोलने करत होती. विशेषतः सिडको-हडको भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. या पाणी टंचाईची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर प्रशासनाने उपाय-योजना सुरू केल्या.
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे हर्सूल तलावातून सात एमएलडी पाणी उपसा सुरू झाला. फारोळा येथून पाच एमएलडी पाणी वाढले आहे. तसेच नहर-ए-अंबर मधून एक एमएलडी मिळत आहे. एमआयडीसीने टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तीन एमएलडी पाणी दिले आहे.
त्यामुळे चिकलठाणा, मुकुंदवाडी, रामनगर, सिडको एन-५, एन-७, हर्सूल, विद्यापीठ परिसर, पहाडसिंगपूरा, बेगमपूरा, जयसिंगपूरा, भावसिंगपूरा, हडको या भागाला पाच दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवसी पाणी मिळत असल्याने नागरिकांचा रोष कमी झाला आहे. असे असले तरी जुन्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झालेला आहे. अनेक भागांना आठ दिवस उलटूनही पाणी पुरवठा झालेला नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.