
औरंगाबादेत काँग्रेसला मोठा धक्का; ZP अध्यक्षांचा भाजपात प्रवेश
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके आणि रामुकाका शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना वैतागून हा पक्षप्रवेश केल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
(Auranagabad Congress ZP President Enters BJP )
शिवसेनेला बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. दरम्यान पक्षश्रेष्ठींनी त्रास दिल्यामुळे आणि निधी न पुरवल्यामुळे आपण नाराज असून त्यामुळे पक्ष सोडत असल्याचं बंडखोरांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांतीलही नाराजी बाहेर येऊ लागली आहे. या पक्षप्रवेशामुळे औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा: "संजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाही, तो बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक"
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे मत फुटल्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाल्याचे आरोप अनेकांकडून केले जात होते. त्यानंतर नवं सरकार स्थापन झाल्यावर सरकारच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर राहिल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हेसुद्धा या गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये सामील होते.
राज्यातील काँग्रेसच्या या स्थितीमुळे केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाच्या स्थितीचा अहवाल मागितला होता. या ११ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राज्यातील पक्षश्रेष्ठींनी केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात होतं. या घटनेनंतर आता औरंगाबादमध्ये काँग्रेसची पहिली विकेट पडली असून जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Web Title: Auranagabad Congress Zp President Meena Shelke Enters Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..