पाइपलाइन दुरुस्तीला लागले तब्बल १४ तास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water pipe line

Aurangabad : पाइपलाइन दुरुस्तीला लागले तब्बल १४ तास

औरंगाबाद जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारी सातशे मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन रविवारी (ता. २२)सायंकाळी फारोळा येथे फुटली होती. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा बंद करून पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले पण दुरुस्तीसाठी तब्बल १४ तास लागले. त्यामुळे जुन्या शहरात सोमवारी (ता. २३) पाच ते सहा तास उशिराने पाणी पुरवठा झाला.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार बिघाड येत आहे. त्यात रविवारी सायंकाळी सातशे मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ अचानक फुटली. त्यामुळे लाखों लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार लक्षात येताच पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाणी उपशाचे पंप बंद केले.

त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, सुभाष लहाडे, नूर कंन्स्ट्रक्शनचे कामगार, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी रात्रीच पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पाइप फुटल्यामुळे त्यास वेल्डिंग करून पंप सुरू करण्यासाठी तब्बल १४ तास लागले. त्यामुळे या वेळेत ढोरकीन येथील गळती बंद करण्यात आली. सोमवारी सकाळी ८.३० वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पंप सुरू करण्यात आले.

जलकुंभ भरल्यानंतर सोमवारी ज्या भागात पाणी पुरवठ्याचा टप्पा आहे, अशा भागाला उशिराने पाणी देण्यात आले. पाच ते सहा तास उशिराने पाणी पुरवठा सुरू झाला. क्रांती चौक, शहागंज, जिन्सी, विश्वभारती कॉलनी या भागात रात्री उशिरापर्यंत बायपासकरून टप्पे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.