‘ऑरिक’मध्ये सात हजार कोटींची गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad 7 thousand crores Investment in Auric

‘ऑरिक’मध्ये सात हजार कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद : औरंगाबाद इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (ऑरिक)मध्ये ७ हजार २० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून १२ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले तर ५० पेक्षा जास्त कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. आगामी काळात १७८ एकरांवर फूड पार्क, बिडकीन येथे १ हजार एकरांवर टेक्स्टाईल पार्क तर ऑरिक येथे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी तसेच ९ एकर जागेवर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून ऑरिक स्वतः वीज वितरण करणार असल्याची माहिती एआयटीएल (ऑरिक)चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. औद्योगिक परिषदेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काकाणी म्हणाले, की ऑरिकमध्ये फूड, टेक्स्टाईल आणि आयटी पार्कसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. बिडकीन येथे १७८ एकरांवर फूड पार्कसाठी जागा प्रस्तावित आहे. येथे छोटे, मध्यम आणि मोठ्या उद्योगांनी प्रक्रिया उद्योग स्थापित केले तर मराठवाड्यातील शेतमालाला चांगला दर मिळेल. तसेच रोजगार निर्मिती होईल.

प्राथमिक स्तरावर साफसफाई, ग्रेडिंग करणे, पुढील टप्प्यात त्या मालाची साठवणूक करणे, त्यामुळे चांगला दर असताना तो विक्री करता येईल. अंतिमतः: या मालावर प्रक्रिया करता येईल. या सर्वांची माहिती आजच्या परिषदेत उद्योजकांना देण्यात आली.

ऑरिकची भरारी..

  • बिडकीनला एक हजार एकरांवर टेक्स्टाईल पार्कचा प्रस्ताव तयार, शिवाय आठ हजार एकर जागेचा विकास सुरू

  • नोव्हेंबरमध्ये आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त उद्योगांना आमंत्रित करणार

  • सर्व औद्योगिक संघटनांना एकत्र घेऊन टास्क फोर्स, स्किल सेंटर तयार करणार

  • ‘ऑरिक’मध्ये ४२ टक्के पाण्याचा फेरवापर, भविष्यात हरित प्रकल्प, विजेसाठी सौर पॅनल लावणार