औरंगाबाद : आधारसाठी जिल्ह्यात केंद्राचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Aadhaar card center Shortage

औरंगाबाद : आधारसाठी जिल्ह्यात केंद्राचा तुटवडा

औरंगाबाद : सरल प्रणालीअंतर्गत विद्यार्थी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदविण्यासह अद्ययावतीसाठी शिक्षण विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. शहरासह जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे मोजकेच केंद्र आहेत. काही खासगी केंद्र चालक आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी पालकांकडून अवाच्या सव्वा दर आकारून लूट करत आहेत. याबाबत आता शिक्षण विभागानेच मार्ग काढावा, असे पालकांचे म्हणणे आहे.

सरकारच्या अनेक योजना, सवलती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड नोंदणी बंधनकारक केली आहे. त्याच बरोबर बहुतांश विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी देखील दुरुस्त करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १२ हजार विद्यार्थ्यांची आधारकार्डशिवाय पोर्टलवर नोंदणी आहे. तर २८ हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये काहींच्या नाव, आडनाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता चुकीचा आहे. या आधार कार्डची नोंदणी व दुरुस्तीसाठी गेल्यावर पालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

शहरात नव्हे तर ग्रामीण भागातही बोटावर मोजण्याइतकी आधार केंद्र आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिवसभर या केंद्रावर ताटकळत बसावे लागत आहे. याशिवाय काही केंद्र चालकांनी दर वाढले असल्याने पालकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे ही लूट थांबवण्यासाठी विद्यार्थ्याच्या आधार कार्ड नोंदणीसाठी शाळा स्तरावरच विशेष कॅम्प लावण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

ग्रामीण भागातील पालकांची धावपळ

जिल्ह्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये बहुतांश मुले ही शेतकरी, मजुरी करणाऱ्या गोरगरिबांची आहेत. नव्याने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी या पालकांना कामधंदा सोडून तालुक्याची ठिकाणी दिवसभर आधार कार्ड काढण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. यातील बहुतांश पालक हे मजुरीसाठी जिल्ह्यात स्थलांतर झाले आहेत. त्यामुळे पालकांची व मुलांची माहिती जुळत नसल्याचे दिसून येत आहे. पर जिल्ह्यातील जन्मदाखला पालकांना आधार कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहेत. परिणामी कागदपत्र जुळविण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागत आहे. मुलांचे आधार कार्ड नोंदणी राहिल्यास भविष्यात मुलांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही या विचाराने पालकांसह शिक्षकही त्रस्त आहेत.

Web Title: Aurangabad Aadhaar Card Center Shortage Teachers Government Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..