Aurangabad : रांजणगाव फाट्याजवळ : ट्रक, दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Aurangabad : रांजणगाव फाट्याजवळ : ट्रक, दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जाणारा ट्रक व कंपनीत जाणाऱ्या कामगाराची दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन बहिणींसह भावाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ घडली.

अनिता कचरू लोखंडे (वय २२), निकिता कचरू लोखंडे (१८), दीपक कचरू लोखंडे (२०, सर्व रा.आसाराम बापूनगर, कमळापूर) असे अपघातातील मृतांची नावे आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सांगितले की, आसाराम बापूनगर, अनिता लोखंडे, निकिता लोखंडे, दोन बहिणी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेणुका ऑटो कंपनीमध्ये कामाला आहे. गुरुवारी (ता.२४) सकाळी सात वाजेच्या सुमारास दीपक दोघी बहिणींना कंपनीत सोडण्यासाठी जात असताना रांजणगाव फाट्याजवळील मॅन डिझेल कंपनीसमोर त्यांच्या पल्सर दुचाकी (एमएच-२१, एएम-६९९५) व मालवाहू ट्रक (एमएच-०४, एफजे-५२८८) यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील तिघे भाऊ, बहीण ठार झाले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलिस कॉन्स्टेबल संजय बनकर व वाहतूक शाखेचे देविदास दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. समाजसेवक मनोज जैन, जोगेश्वरीचे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, रोहिदास मारकवाड, शिवगीर गिरी, सुरेश गायकवाड, विकास चव्हाण यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत मृतांना घाटीत दाखल केले.

चालक ठाण्यात हजर

अपघात होताच ट्रकचालक अजमद शेख हबीब शेख (वय २६, रा.खंडाळा ता.वैजापूर) हा अपघात स्थळावरून फरार झाला. दोन तासांनंतर तो ठाण्यात हजर झाला. नांदेड येथून सोयाबीन ट्रकमध्ये भरून तो वाळूज औद्योगिक वसाहतीतील ग्रीन गोल्ड कंपनीच्या करोडी परिसरात असलेल्या गोडाउनमध्ये जात होता.

एकुलताएक दीपक गेल्याने आई-वडील सुन्न

पांढरी पिंपळगाव येथील कचरू लोखंडे हे मिस्तरी काम करण्यासाठी वाळूज औद्योगिक वसाहतीत सुमारे २५ वर्षांपूर्वी आले होते. ते कुटुंबासह कमळापूर येथील आसाराम बापूनगरमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना पाच मुली व दीपक एकुलता एक मुलगा होता. या अपघातात लोखंडे यांच्या दोन मुलीसह एकुलता एक दीपक ठार झाल्याची माहिती मिळताच ते सुन्न झाले.

कुटुंबाचे सांत्वन

या भीषण अपघाताची माहिती मिळताच येथील उद्योजक अमोल लोहकरे, जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन बोंबले, माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तथा नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्ष सविता शिंदे आदींनी आसाराम बापूनगर येथील घरी जाऊन लोखंडे परिवाराचे सांत्वन करीत त्यांना आर्थिक मदत देत धीर दिला.