Aurangabad Accident : कामावर जाणाऱ्या भावंडावर काळाचा घाला; दोन बहिणी अन् सख्ख्या भावाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

Aurangabad Accident : कामावर जाणाऱ्या भावंडावर काळाचा घाला; दोन बहिणी अन् सख्ख्या भावाचा मृत्यू

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जाणारी ट्रक व कंपनीत जाणाऱ्या कामगाराची दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोन बहिणीसह भाऊ ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ झाला.

या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

आसाराम बापूनगर, कमळापूर येथील अनिता कचरू लोखंडे (वय 22) व निकिता कचरू लोखंडे (वय 18) या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेणुका ऑटो कंपनीमध्ये काम करतात. गुरुवारी (ता.24) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास या दोघी बहिणींना दीपक कचरू लोखंडे (वय 20) हा भाऊ कंपनीत सोडण्यासाठी जात होता. रांजणगाव फाट्या जवळून पुढे जाताच मँन डिझेल कंपनीच्या समोर त्यांच्या पल्सर दुचाकी (एमएच 21,ए एम - 6995) व मालवाहू ट्रक (एमएच 04, एफजे - 5288) यांच्यात अपघात झाला.

या भिषण अपघातात दुचाकीवरील दोघी बहिणी व भाऊ असे तिघेही ट्रकच्या पाठीमागीलडाव्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल संजय बनकर व वाहतूक शाखेचे देविदास दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान समाजसेवक मनोज जैन, जोगेश्वरीचे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, रोहिदास मारकवाड, शिवगीर गिरी, सुरेश गायकवाड, विकास चव्हाण यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना घाटीत दाखल केले.