Aurangabad : तब्बल २७ तासांनंतर जलवाहिनी दुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : तब्बल २७ तासांनंतर जलवाहिनी दुरुस्त

औरंगाबाद : शहराला पाणी पुरवठा करणारी ७०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाइन पैठण रोडवरील कवडगावजवळ शुक्रवारी दुपारी फुटली होती. त्यानंतर महापालिकेने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले. असे असले तरी दुरुस्तीला तब्बल २७ तास लागले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता शहरात पाणी येण्यास सुरवात झाली. पण जुन्या शहरातील अनेक भागांना १२ ते १५ तास उशिराने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहराचा पाणीपुरवठा तांत्रिक कारणांमुळे वारंवार विस्कळित होत आहे. त्यात शनिवारी ७०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाइन शुक्रवारी दुपारी तीनदरम्यान कवडगावजवळ फुटली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह आशिष वाणी, सुभाष लहाडे यांच्यासह खासगी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले.

दरम्यान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनीही दखल घेत दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला. पण जुना पाइप मिळण्यास अडचणी आल्या. पाइप मिळाल्यानंतर तो जोडण्याचे काम दुपारी ४ वाजता पूर्ण झाले. इतर आवश्‍यक कामे सायंकाळी पाच वाजता काम पूर्ण केले. त्यात तब्बल २७ तास पाणी उपसा बंद होता. सायंकाळी पंप सुरू करण्यात आले व नक्षत्रवाडी येथील सम्बमध्ये पाणी येण्यास सुरवात झाली. दरम्यानच्या काळात दिवसभर जुन्या शहरातील अनेक जलकुंभ कोरडे होते. त्यामुळे शुक्रवारी ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता. तिथे एक दिवस उशिराने पाणी दिले जाणार आहे.

या आठ टाक्यांच्या वितरणावर परिणाम

पाइपलाइन फुटल्याचा फटका जुन्या शहराला बसला. नक्षत्रवाडी, कांचनवाडी, वेदांतनगर, हमालवाडा, सिल्कमिल कॉलनी, सादातनगर, विश्वभारती कॉलनी, क्रांतीचौक येथील पाण्याच्या टाक्यात दिवसभर पाणी नव्हते. त्यामुळे या भागाचा पाणी पुरवठा विस्कळित झाला.