
औरंगाबाद : शहरात सुरू असलेल्या अग्निविरांच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सोयी मिळवून देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. हे कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासनानेही भरतीत सहभागींसाठी भोजन, वाहतूक, स्वच्छतागृहे आदींची चोख व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळावा, मातृभूमीची सेवा आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्नीवीर जनरल ड्यूटी (सर्व शस्त्र), अग्नीवीर ट्रेडसमन (सर्व शस्त्र), अग्नीवीर तांत्रिक (सर्व शस्त्र), अग्नीवीर लिपिक, भांडारपाल तांत्रिक (सर्व शस्त्र) या पदांसाठी भरती प्रक्रिया १३ ऑगस्टपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू आहे. भरती प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना १३ नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शिस्तबद्ध, पारदर्शक, नि:पक्षपाती पद्धतीने व योग्य नियोजनाने भरती प्रक्रिया भरती अधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील तरूण या भरतीत सहभागी झालेले आहेत. या उमेदवारांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. भरती प्रक्रिया परिसरात स्वच्छता राखली जावी, या उद्देशाने महानगर पालिकेने पाण्याची व्यवस्था, परिसर स्वच्छता, फिरते शौचालये आदींची व्यवस्था केलेली आहे.
भरती ठिकाणाहून उमेदवारांना बस स्थानक, रेल्वे स्थानक येथे पोहोचविण्याची सोयही राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे. या सुविधेमुळे भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने चांगली व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.
सर्व सोयी सुविधा उपलब्ध
सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती दरम्यान मैदानावर आवश्यक प्रकाश योजनेसाठी दोन जनरेटर्स, जिल्हा परिषदेने १० शिक्षक, भरतीत कुणास इजा झाल्यास तत्काळ उपचार मिळावा, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मैदाने, राहण्याची व्यवस्था, एनआयसीद्वारा इंटरनेट सुविधा आदी सोयी भरती कालावधीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दररोज मध्यरात्री १२ वाजता भरती प्रक्रिया सुरू होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत शिस्तबद्धरीत्या व पारदर्शकपणे पार पाडली जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.