Aurangabad : दारुमुळे उद्‍ध्वस्त झाल्याने तो रेल्वेपटरीवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : दारुमुळे उद्‍ध्वस्त झाल्याने तो रेल्वेपटरीवर!

औरंगाबाद : गावातून शहरात चांगल्या व्यवसायाच्या आशेने आला. मात्र, दारूच्या व्यसनाने बरबाद झाल्याने काम मिळत नाही. घरात अन्नाचा एक कण नाही. जगून काय उपयोग, असा विचार करीत तरुणाने थेट रेल्वेची पटरी गाठली. सतर्क नागरिकांनी त्याला वाचवण्यात समुपदेशनही केले.

देवानगरी भागातील श्रीमंत गोर्डे पाटील यांनी सांगितले की, शनिवारी (ता. बारा) सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान ३२ वर्षाचा युवक हा रेल्वे पटरीजवळ उभा होता. कधी तो पटरी जवळ यायचा तर कधी दूर व्हायचा? ही त्याची घाळमेळ या भागातील नागरिकांच्या लक्षात आली. श्रीमंत गोर्डे पाटील, उस्मान पेंटर, बबू धर्मपूरी, रख्माजी राऊत यांनी या तरूणाला रेल्वे रूळापासून दूर नेले. त्याला आत्महत्या करण्याबाबत कारण विचारले. यावेळी त्याने सांगितले की, चार वर्षापूर्वी मराठवाड्यातील एका गावातून औरंगाबादला आला होता. या ठिकाणी त्याने सलूनचे दुकान सुरू केले होते. हा व्यवसाय चांगला सुरू होता.

घरात पत्नी आणि ६ वर्षाची मुलगी आहे. गेल्या सहा महिन्यापासून दारूची सवय लागली. यामुळे त्याचे व्यवसायाकडे दुर्लक्ष होत गेले. हातात पैसे आले की दारूमध्ये जात होते. त्यामुळे दुकान मालकाने दुकान ताब्यात घेतले. यानंतर हाल सुरू झाले. घरात पैसे नाही. म्हणून पत्नीशी भांडण सुरू होते. बाहेर काम मिळत नव्हते. काही दिवस भिक मागीतली. तरीही काही होत नव्हते. घरात आणि पोटात अन्नाचा कण नाही. म्हणून जीव द्यायला आलो असल्याचे त्याने सांगितले. त्याला श्रीमंत गोर्डे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवण दिले. त्यानंतर एका ठिकाणी कामाची व्यवस्थाही करून दिली. तसेच दारू सोडण्याचे सांगत त्याचे समुपदेशनही केले.