esakal | Aurangabad: धडाका अन् तडाका मुसळधार...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad: धडाका अन् तडाका मुसळधार...

Aurangabad: धडाका अन् तडाका मुसळधार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहर परिसरात पावसाचे धुमशान सुरूच आहे. शनिवारी (ता. दोन) पहाटे नागरिक साखरझोपेत असताना मुसळधार पावसाने पुन्हा शहराला झोडपून काढले. अवघ्या २५ मिनिटात ५१.२ मिलिमिटर एवढा धुवाधार पाऊस झाला. ढगफुटीसदृश झालेल्या या पावसामुळे हाहाकार उडाला. खाम, सुखना नदीला मोठा पूर आल्याने नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागाला पाण्याचा वेढा पडला. सुमारे तीनशे ते चारशे घरांत पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. सकाळी ९.३० नंतर पुराचे पाणी ओसरले. या पुरामुळे नारेगाव, चिकलठाणा भागातील चार ते पाच पूल, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नारेगावात सर्वाधिक नुकसान

सुखना नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका नारेगाव भागाला बसला. नारेगावातील सुखना नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद पडली. या पुलाचा मोठा भाग वाहून गेला. अन्य एका पुलावरून देखील पावसाचे पाणी वाहत होते. मांडकी येथील ओढ्याला मोठा पूर आला. त्यामुळे नारेगाव कचरा डेपोलगत असलेला पूर वाहून गेला. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला पण या रस्त्यावर देखील ट्रक फसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नारेगावातील अनेक गल्ल्या, छोट्या उद्योगांचे शेड पाण्यात होते.

नागरिक होते साखर झोपेत

शहराला गुलाब चक्रीवादळाने २८ सप्टेंबरला जोरदार तडाखा दिला होता. त्यापूर्वी देखील शहरात जोरदार पाऊस झाला होता. शनिवारी शाहिन चक्रीवादळामुळे शहर परिसराला पहाटेच्या धडाकेबाज पावसाने झोडपून काढले. सुरवातीला पहाटे ३.२५ वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर ३.३८ दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे ३.३८ ते ४.०३ या पंचवीस मिनिटात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह सरासरी ११८ मिलिमिटर प्रतितास या वेगाने पाऊस पडला. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या खाम, सुखना नद्यांसह नाल्यांना पूर आला. विशेष म्हणजे, नागरिक पहाटेच्या साखर झोपत होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याचे लक्षात येताच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.

अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन सुरू झाले. तोपर्यंत नारेगाव, नूर कॉलनी भागात अनेकांच्या घरात पाण्याची पातळी कंबरेपर्यंत होती. पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे साडेनऊच्या सुमारास नद्यांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली व नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. दरम्यान, शहरातील अनेक भागात या पावसाचा फटका बसला. तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. या पावसात चिकलठाणा येथील दोन्ही स्मशानभूमीची भिंत कोसळली, नूर कॉलनी, हिमायत बाग, असेफिया कॉलनी, कटकटगेट तसेच उल्कानगरी, पुंडलिकनगर, विश्रांतीनगर, सादातनगर, गारखेडा, समर्थनगर, कबाडीपुरा या भागातील घरासह तळमजल्यात पाणी शिरले. अनेक भागाचा वीजपुरवठा खंडित झाला.

तीन पूल पाण्याखाली

सुखना नदीला मोठा पूर आल्याने चिकलठाणा गावातील तीन पूल सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याखाली होती. गोरक्षक कॉलनी, करवंदे वाडी, स्मशानभूमीला जोडणाऱ्या पुलावरून सकाळी १० फुटापर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे या भागाचा चिकलठाण्याशी संपर्क तुटला होता. तसेच सावता मंगल कार्यालयाशेजारील व अन्य एका पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर शेतात जाता आले नाही. दरम्यान चिकलठाणा एमआयडीसी भागातील काही कंपन्यांच्या परिसर जलमय झाला होता.

loading image
go to top