aurangabd: गुदमरलेल्या वातावरणात करावा लागतो अभ्यास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabd news

Aurangabad: गुदमरलेल्या वातावरणात करावा लागतो अभ्यास!

औरंगाबाद : स्पर्धेच्या या काळात परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूपीएससी, एमपीएससी, नीट, जेईई, सीईटी, सीए, यासारख्या स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यासासाठी घरापेक्षा अभ्यासिकांना प्राधान्य देतात. त्यामुळे शहरांमध्ये अभ्यासिकांचे पेव फुटलेले आहे. पुरेसा सूर्यप्रकाश, शुद्ध हवा आणि चांगल्या वातावरणासाठी विद्यार्थी अभ्यासिकांमध्ये जातात.

मात्र, त्यांचा उद्देश सफल होत नाही. कारण अल्पभाडे आणि बक्कळ नफ्यामुळे तळघरातही अभ्यासिका सुरू झालेल्या आहेत. तेथील कोंदट वातावरणामुळे विद्यार्थ्यांनाच त्रास होतो. तासभर अभ्यास झाल्यानंतर जीव गुदमरल्यासारखा होतो. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रकारही घडत आहेत.

शहरात राहत असताना कुणाच्या घरात जागा कमी असते, तर कुणाला शांतता हवी असते. कुणी अभ्यासाचे वातावरण असते म्हणून अभ्यासिकेत जात असतो. पण जागाभाडे कमी असल्याने तळघरात अभ्यासिका सुरू करण्याचा ट्रेंड शहरात वाढत आहे. खर्च कमी आणि अधिकची कमाई असल्याने अभ्यासिकेतील इतर सुविधांना दुय्यम स्थान मिळत आहे.

वाय-फाय सुविधा फक्त सांगायलाच असते. या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, अभ्यास करताना निरोगी वातावरण असणे महत्त्वाचे आहे. याला सध्या विद्यार्थीही महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे, हे तळघरातील अभ्यासिकेतील संख्येवरूनच लक्षात येते.

ऑक्सिजन कमी,आर्द्रता जास्त

डॉ. सुनील देशमुख, (प्राध्यापक, ईएनटी विभाग प्रमुख घाटी रुग्णालय) ः पावसाळ्यात तळघरातील खोलीत हवेमध्ये आर्द्रता जास्त असते. त्यामुळे कानातील मळाला बुरशी होण्याची शक्यता असते. यातून कानाचा ओटोमायकॉसिस हा आजार होतो. म्हणजे कान गच्च होणे, खाज सुटणे, पांढरे द्रव्य येणे, असे प्रकार होतात.

तळघरामध्ये ऑक्सिजनही कमी असतो. त्यामुळे अभ्यास करताना बऱ्याच वेळ बसल्यास गुदमरल्यासारखे होते, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने अभ्यासातही लक्ष लागत नाही. आकलनावर परिणाम होतो. तसेच बुरशीमुळे सर्दी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अभ्यासिकेत स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा असायला हवी.

अशी असायला हवी आदर्श अभ्यासिका

धर्मराज वीर, (संचालक, ज्ञानस्रोत केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) अभ्यासिकेत नैसर्गिक प्रकाश असावा, हरित अभ्यासिका हा प्रकार बॅंकॉकसारख्या देशात पहायला मिळत आहेत. त्याठिकाणी काचेतून बाहेर सगळे हिरवेगार दिसते. त्यामुळे तिथे वाचन करताना मन प्रसन्न होते.

वाचनकक्षात चांगल्या खुर्च्या, जवळच कॅफे असावा. अभ्यासिकेत ग्रंथसंपदा असलीच पाहिजे. डेटा, ई-बुक हे सगळे असले तरी, डिस्कव्हरी सर्च टूलचीही उपलब्धता असावी. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआय) असेल तर, पुस्तक शोधण्यासाठी अडचण येत नाही.

ऑनलाइन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग (ओपीएसी) च्या माध्यमातून अभ्यासिकेत आपल्याला हवे ते पुस्तक इथे उपलब्ध आहे का? याची माहिती मिळते. मोबाइल ॲपचा वापरही काही अभ्यासिका वापर करत आहेत. या प्रकारच्या सुविधा देण्याचा विचार मोठ्या अभ्यासिकांनी केला पाहिजे.

Web Title: Aurangabad Atmosphere Suffocating Environment Invitation To Diseases By Mosquitoes And Dengue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..