Aurangabad : भाजप भेदणार शिवसेनेचा गड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp and shivsena

Aurangabad : भाजप भेदणार शिवसेनेचा गड?

औरंगाबाद : कधी न लढविलेल्या लोकसभा ताब्यात घेण्यासाठी भाजपने देशभरात चांगलाच जोर लावला आहे. यातच शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपतर्फे मोठी मेहनत घेण्यात येत आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्या हातून ही जागा गेल्यामुळे या जागेवर भाजप दावा करीत आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी (ता.२) सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या सभेतून भाजप लोकसभेचे रणसिंग फुंकणार आहे.

शिवसेनेचा गडाला भेदण्यासाठी जे. पी. नड्डाची सभा महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे. या सभेसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आणि सर्व आघाडी, मोर्चा यांच्यातर्फे मोठा जोर लावण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने बैठकामागून बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक बूथवरून २० ते ४० लोक सभेला येणार आहेत. या सभेच्या माध्यमातून भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे महापालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेस इच्छुक असलेलेही या सभेसाठी मेहनत घेत आहे.

शिवसेनेचा मतदार वळवण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहे. शिंदेची शिवसेना भाजपसोबत असल्याने भाजपला याचा फायदा होणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादची लोकसभेची जागा जिंकणारच असा निर्धारच भाजपने केला आहे. तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या सभेमुळे चलबिचल सुरू आहे. मात्र, याचा काहीही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. असे असले तरी भाजपच्या शक्तिप्रदर्शनानंतर शिवसेनेतर्फे काऊंटर अटॅक करण्यासाठी हालचाली करण्यात येतील असेही बोलले जात आहे.

शहर भाजपमय

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष येत असल्यामुळे त्यांची सभेची जंगी तयारी भाजपने केली आहे. सांस्कृतिक मंडळावर भाजपच्या रंग असलेल्या मांडव लावण्यात आला आहे. यासह शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. यामुळे शहर हे भाजपमय झाले आहे.

निमंत्रणावरून 'माधवबन'चा आरोप

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभेला भाजपच्या राष्ट्रीय महिला सचिव पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप ''माधवबन'' ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्राचार्य डॉ.खुशाल मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत आहे. यामुळे बहुजन समाजात नाराजीचा सूर दिसत आहे. असेच होत असल्यास याचे परिणाम वेगळे होतील, असा इशाराही खुशाल मुंडे यांनी दिली आहे.