औरंगाबाद : चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या ठोकल्या बोगस स्वाक्षऱ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake signature

औरंगाबाद : चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या ठोकल्या बोगस स्वाक्षऱ्या!

औरंगाबाद ः शिक्षण विभागाचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून तनश्री विद्यामंदिर शाळेतील दोन शिक्षकांची मान्यता घेत वेतन सुरू करण्यात आले. या प्रकरणात फसवणुकीबद्दल मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. मांजरेकर यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा २०१४ मध्ये तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्याकडे मार्च २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान प्रभारी पदभार होता. याच काळात प्रबोधन बहुविध संस्थेच्या तनश्री विद्यामंदिरात संस्थेच्या अध्यक्ष व सदस्यांनी त्यावेळी नुकतेच बदलून गेलेले शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शिक्षिका नीता इंगळे व शिक्षक मनोज वाघ यांचे नियुक्तिपत्र तयार केले व वैयक्तिक मान्यता घेत भविष्य निर्वाह निधी पथकाच्या मदतीने वेतन सुरू केले.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

याबाबत संस्थेचे सचिव मनोज श्रीधरराव मुळे यांनी माहितीच्या अधिकारात शिक्षण विभागातून सर्व पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी अॅड. सचिन चव्हाण व अॅड. मिर्झा जावेद बेग यांच्यामार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) प्रमाणे न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात अॅड. मिर्झा जावेद बेग यांनी युक्तिवाद केला. न्यायालयातील युक्तिवाद व सादर झालेले पुरावे आणि वस्तू स्थिती लक्षात घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. मांजरेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष पद्माकर इंगळे, सदस्य शालिनी सांबरे, संगीता इंगळे शाळेच्या मुख्याध्यापिका नीता इंगळे, शिक्षक मनोज वाघ तसेच शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिक्षक भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) चे अधिकारी सुहास पागे यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास करण्याचे आदेश दिले.

loading image
go to top