Aurangabad : नऊ महिन्यात दीडशेवर मुले-मुली बेपत्ता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Aurangabad : नऊ महिन्यात दीडशेवर मुले-मुली बेपत्ता!

औरंगाबाद : आई-वडील नोकरी, व्यवसाय करतात. अशातच घरात आजी-आजोबाही नसल्याने किशोरवयीन मुलामुलींकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसते. त्यामुळे मुलामुलींचे शाळेतील आणि शेजारी, जवळपास राहणारे सोडले तर मोबाईलच हेच जग असते. यातून सोशल मिडीयाची पूर्णपणे ओळख न झाल्याने त्यातील धोके कोणी समजावून सांगत नाही. त्यातून आभासी ओळखी होऊन कुटूंबापासून पळून जाणे, अत्याचार होण्यासारखे प्रकार घडतात. याच प्रकारातून शहरातून मागील नऊ महिन्यात १६६ मुले-मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १२४ जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे यातील सहा मुले-मुली एकत्र पळून गेल्यानंतर मानवी तस्करीविरोधी पथकाने परत आणण्याची कामगिरी केली.

घरातील किशोरवयीन मुला-मुलींना वेळ देण्यासाठी आई-वडीलांकडेच वेळ नसतो. त्यात सोशल मिडीयासारख्या व्यासपीठाचा वापर करण्याविषयीची जागरुकता (काही पालकांचा अपवाद वगळता) नसते. दोन वर्षातील शंभराहून अधिक दाखल प्रकरणांमध्ये प्रामुख्याने ९० टक्के प्रकरणे ही सोशल मिडीयातून झालेल्या ओळखीनंतर तसेच विविध मार्गांनी ओळखी झाल्यानंतर लग्नासारखी अनेक आमिषे दाखवून पळवून नेणे आणि पळून जाणे अशी प्रकरणे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एएचटीयूची मोठी कामगिरी,परप्रांतातहूनही आणले परत

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सायबर ठाणे वगळता १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २०२१ या वर्षात तब्बल १५२ अल्पवयीन मुलेमुली विविध कारणावरुन राहत्या घरातून पळून गेले. यापैकी अनेक मुलींना सोशल मिडीयातून तसेच इतर माध्यमातून ओळख होऊन मैत्री वाढवत प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार घडल्यानंतर सदर मुलामुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल होतो.

त्यानंतर सदर पोलिस ठाण्याकडून चार महिन्यानंतरही सदर मुलामुलींचा शोध न लागल्यास तो गुन्हा शहर पोलिस आयुक्तालयातील ‘एएचटीयु’कडे (मानवी तस्करीविरोधी पथक) वर्ग होतो. या कक्षाचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या पथकाकडे वर्ग झालेल्या १७ गुन्ह्यांपैकी १४ गुन्ह्यातील मुलामुलींचा शोध घेऊन परत आणल्याची मोठी कामगिरी पथकातील सहायक फौजदार आय. यु. पठाण, अंमलदार डी. बी. खरे, संतोष त्रिभुवन, बाबासाहेब राठोड, महिला अंमलदार जयश्री खांडे, अमृता काबिलीये, हिरा चिंचोळकर, पुजा मनगटे, मोहिनी चिंचोळकर यांनी केली आहे.

यापैकी मुले-मुली मिळून सोबतच पळून गेलेल्या १० जणांना मानवी तस्करीविरोधी पथकाने अगदी परप्रांतातही दिवसांची रात्र करुन शोध घेत परत आणले आहेत. वरील आकडेवारी ही त्या त्या महिन्या,वर्षातील आहे. यातील मुलेमुली मिळण्याचे प्रमाण पूर्णही झालेले असू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.

पळून गेलेले-बेपत्ता झालेले - शोधून आणलेले

वर्ष मुले मुली एकूण शोधलेले मुले मुली एकूण (न सापडलले)

२०२१ ३९ ११३ १५२ ३६ ९४ १३० २२

२०२२ ४३ १२३ १६६ ३२ ९२ १२४ ४२

(सप्टेंबर २०२२ अखेर )