esakal | कहर! दोनशे लोकसंख्येच्या गावात पन्नासच्या वर ग्रामस्थ कोरोना पाॅझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

null
कहर! दोनशे लोकसंख्येच्या गावात पन्नासच्यावर ग्रामस्थ कोरोना पाॅझिटिव्ह
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक ग्रामीण भागात वाढत असून दोनशे उंबऱ्याच्या गावांत पन्नासवर रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने तालुका प्रशासनाने सुलतानपूर (ता.पैठण) गावास मायक्रो कटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या गावासह अन्य गावांतही कोरोनोचा प्रादूर्भाव वाढल्याने अनेकजण आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शेतात वास्तव्याला जाऊन ते कोरोनाला हुलकावणी देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र आरोग्य विभाग निद्राधीन असून त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कोरोना आपला विळखा घट्ट करीत आहे. आतापर्यंत परिसरात कोरोनाबाधित पंधरावर नागरिकांनी जीव गमावला.

प्रत्येक ठिकाणी शासनाकडून 'माझे कुटुंब..... माझी जबाबदारी ', 'आमचा गाव.... आमची जबाबदारी' चे आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी त्याला प्रशासकीय यंत्रणेच्या धाकामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेने 'आम्हाला काय देणे - घेणे'चे ब्रीद अवलंबविल्याने पाचोड (ता पैठण) परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. नांदर व बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदासीन वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या बाबींकडे पूर्णतः डोळेझाक करुन आरोग्य सहायकावर जबाबदारी सोपवून ' हात' वर केल्याने कोरोनाबाधित रुग्ण मरणाच्या दारात जाईपर्यंत फारसे कुणी गांभीर्याने घेण्यास तयार नाही.

बहुतांश ग्रामस्थ परस्पर तपासण्या करून विविध रुग्णालयात स्वतःहून उपचार घेत आहेत. यापासून आरोग्य प्रशासन अनभिज्ञ आहेत. तूर्तास परिसरातील वडजी, थेरगाव, हर्षी, दादेगाव, रांजणगाव दांडगा, लिंबगाव, मुरमा, बोडखा येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सुलतानपूर गावातील रुग्णांची संख्या कमालीची वाढली असल्याने तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सोमवारी (ता.२०) हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करून गावातील कोरोनावर मात करण्यासाठी सॅनिटायझर, सामाजिक अंतर, मास्कचे पालन करण्यासाठी गावाच्या सरपंचासह तलाठी, पाचोडचे मंडळाधिकारी, पोलिस पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवून कारवाईच्या सुचना दिल्या असून आरोग्य विभागास तातडीने सुलतानपुर येथे पाठवून ग्रामस्थांच्या अँटिजेन तपासण्या करण्याचे आदेश दिले. गावांत आरोग्यपथक आल्याचे समजताच निम्म्यावर ग्रामस्थ आपापल्या शेतात निघून गेले. ज्याची तपासणी झाली असे ४७ रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आले.

सुलतानपुर हे दोनशे उंबऱ्याचे गाव, गावात पाचशेच्या जवळपास मतदार असल्याने एकच प्रभाग असून दोन प्रभाग रांजणगाव दांडगा येथे असून या दोन्ही गावांसाठी संयुक्त ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. गावांतील सुशिक्षितवर्ग औरंगाबादला राहत असल्याने गाव तसे दुर्लक्षित आहे. वारंवार सूचना देऊनही कोरोनाचे प्रतिबंधित नियम न पाळल्याने अवघे गावच संक्रमित झाल्याचे पाहावयास मिळते. मागील आठवड्यात येथील एका कुटुंबाकडे बाहेरगावाहून काही कोरोनाबाधित नातेवाईक भेटण्यासाठी आले होते. त्यांची कुणास कल्पना नसल्याने हे पूर्ण गाव कोरोना संक्रमित झाले. सर्वांना मास्क वापरणे, व्यवहार बंद ठेवून सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. दुर्लक्षित आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी, मागणी गावातील एकनाथ आंधळे यांनी केली.

यासंबंधी तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले,'आपले गाव आपली जबाबदारी समजून सरपंच, पोलिस पाटील व प्रत्येक ग्रामस्थाने तर माझं घर माझं कुटूंब याचे भान ठेवून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने सामाजिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. जोपर्यत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यत प्रत्येकाने स्वतःला अग्रस्थानी ठेवून गृहविलगीकरणाचा अवलंब करावा, सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे.