esakal | मातीचे सर्वात मोठे जायकवाडी धरण अंधारात; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात, मेणबत्तीचा घ्यावा लागतो आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakwadi Dam News

सध्या नाथसागर जलाशयाच्या तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांना अंधारात कर्तव्य निभावताना मोठी कसरत करावी लागत असून त्यांना मेणबत्ती लावून त्याचा सहारा घ्यावा लागत आहे.

मातीचे सर्वात मोठे जायकवाडी धरण अंधारात; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात, मेणबत्तीचा घ्यावा लागतो आधार

sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरण व श्री संत ज्ञानेश्वर उद्यान यांचा विद्युत पुरवठा गेल्या २९ दिवसांपासून खंडित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना रात्री-बेरात्री कर्तव्य बजावत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आशिया खंडातील सर्वांत मोठ्या मातीचे धरण असणारे नाथसागर जलाशय हा सध्या अंधाराच्या छायेत असून हे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथे विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत बिल थकीत असल्याने नाथसागर जलाशय व श्री संत ज्ञानेश्वर उद्यानमध्ये रात्री काळोख पसरलेला आहे.

तसेच उद्यानामधील फुलझाडे व झाडांना पाणीपुरवठा विद्युत पुरवठा अभावी बंद असल्याने ते वाळुन जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे त्वरीत लक्ष न दिल्यास हिरवळीने नटलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचे भकास होऊन बसेल. सध्या जायकवाडी नाथसागर जलाशय परिसरात रात्री-अपरात्री कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य निभावताना त्यांना येथे सरपटणारे व जलचर प्राण्यापासून धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे येथील विद्युत पुरवठा चालू करण्याबाबत अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, औरंगाबाद यांना जायकवाडी कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, जायकवाडी नाथसागर व संत ज्ञानेश्वर उद्यान येथील विद्युत पुरवठा जोडणी करून द्यावी. निधी मागणी मंजूर झाल्यानंतर तात्काळ विद्युत देयके भरण्यात येतील. सध्या नाथसागर जलाशयाचे चार लाख ९५ हजार रुपये, तर संत ज्ञानेश्वर उद्यानाचे ११ लाख ७९ हजार रुपये विद्युत देयके थकीत आहे. सध्या नाथसागर जलाशयाच्या तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांना अंधारात कर्तव्य निभावताना मोठी कसरत करावी लागत असून त्यांना मेणबत्ती लावून त्याचा सहारा घ्यावा लागत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


महावितरणच्या विद्युत देयकाच्या थकबाकीमुळे जायकवाडी नाथसागर व श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर देयकाच्या रक्कमेची मागणी विभागीय कार्यालयामार्फत अधीक्षक अभियंता कडा कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली आहे. ती प्राप्त होताच प्रलंबित विद्युत देयकाची रक्कम भरण्यात येईल. तोपर्यंत महावितरणने विद्युत जोडणी करून देण्यात यावी. याबाबतचे पत्र कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग यांनी अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय यांना दिलेले असताना देखील विद्युत पुरवठा खंडित केला.
- ज्ञानदेव शिरसाट, उपविभागीय अभियंता दगडी धरण

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top