गड आला पण सिंह 'मारला' गेला...

Aurangabad dcc bank election result.
Aurangabad dcc bank election result.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर सोमवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार व जिल्हा बॅंकेच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी, मुरब्बी असे नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. बागडेंचा पराभव हे आजच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य. या पराभवाचे वर्णन मंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘गड आला पण सिंह गेला’ असे केले असले तरी ‘गड आला पण सिंह मारला गेला’ असेच करावे लागेल. 

काँग्रेसचे नेते व या बँकेचे सर्वेसर्वा दिवंगत नेते सुरेश पाटील यांनी एकहाती या बॅंकेची सत्ता चालविली. त्याकाळात भाजप शिवसेनेसारखे पक्ष सहकारासारख्या क्षेत्राकडे फटकून राहायचे. त्यावेळी हरिभाऊंनी कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाला त्याच पध्दतीचे उत्तर देत मतदारसंघातील गावागावांत विविध कार्यकारी सोसायट्या, बाजार समिती, देवगिरी बॅंक, साखर कारखाना, शिक्षण संस्था आदींच्या माध्यमातून आपले वर्चस्व निर्माण केले. भाजपची सत्ता किमान आपल्या तालुक्यात मजबूत केली. अशा स्थितीत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे नेतृत्व करण्याची संधी आली असताना नेमका त्यांचा पराभव झाला.

एकीकडे सगळे पॅनेल निवडून येत असताना केवळ नेत्याचा पराभव कसा काय होतो? बिगर शेती मतदारसंघात चौदापैकी पाच उमेदवार हे १७६ ते १४७ इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. सर्वाधिक १७६ मते शेतकरी सहकार पॅनेलचे नेते डॉ. कल्याण काळे यांचे भाऊ जगन्नाथ काळे व माजी अध्यक्ष नितीन पाटील यांना मिळाली आहेत. तर या मतदारसंघात सर्वात कमी १४७ मते घेऊन नवीन उमेदवार अभिषेक जैस्वाल विजयी झाले आहेत. सहाव्या क्रमांकावर हरिभाऊ (१२३ मते ) आहेत. हरिभाऊ बागडे, मंत्री अब्दुल सत्तार व मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला सत्ता मिळाली असली तरी कॉँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांच्या पॅनेललाही पाच जागा मिळाल्या असल्याने सत्ताधारी पॅनेलची वाट निश्चितच सुकर नसेल. त्याची बीजे निवडणूक प्रचाराच्या संग्रामात दिसत होतीच.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना मंत्रीद्वय संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला म्हणजे हरिभाऊंना सोबत घेऊन पॅनेल कसे बनविले असा खडा सवाल करत शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बागडे व आपल्याच पक्षाचे अंबादास दानवे यांच्यावर टीका केली होती, काँग्रेसच्या पॅनेलला पाठिंबा जाहीर केला होता. बागडे यांचे आता वय झाले असून त्यांनी आता थांबायला हवे तसेच अंबादास दानवे यांना शिवसेना कळली नाही, असे शब्दबाण मारले होते. नंतर दुसऱ्याच दिवशी हरिभाऊ व अंबादास दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत देवगिरी किल्ला चढण्याचे आव्हान दिले होते. तर अंबादास दानवे यांनीही मला खैरै समजले नसतील पण शिवसेना कळलीय, असा शेलक्या शब्दांत हल्ला केला होता. या निकालानंतर मात्र हरिभाऊ कदाचित देवगिरी किल्ला सर करतील पण त्यांना जिल्हा बॅँकेच्या पायऱ्या मात्र चढता येणार नाही.


कोण करणार नेतृत्व?-

कॉंग्रेसचे दिवंगत नेते सुरेश पाटील यांनी या बँकेचे निर्विवाद असे नेतृत्व केले. त्या त्या तालुक्यांतील राजकीय नेत्यांचे एक दोन संचालक घेऊन, आपले जादा संचालक ठेवून सुरेश पाटील बेरजेचे राजकारण करत. त्यात भुमरे, सत्तार, डोणगावकर ही मंडळी असायची; पण हरिभाऊंना थेट न घेता त्यांच्या एक दोन लोकांना ते सामावून घ्यायचे. मग राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी बॅँकेवर वर्चस्व पाटील यांचेच राहायचे. ते सहकारातील हुशार, अभ्यासू असल्याने त्यांच्या नेतृत्वाचा जिल्हा बँकेला फायदाही झाला. अन्यथा मराठवाड्यातील इतर जिल्हा बॅँकासारखी ही बॅंकही डबघाईला आली असती. आता सुरेश पाटील यांच्या निधनानंतर बॅँकेवर नवीन नेतृत्व उदयास आणण्याची संधी निर्माण झाली आहे.

मात्र मंत्री असल्याने सत्तार, भुमरे यांना अध्यक्ष होता येणार नाही. तर आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे हे पहिल्यांदाच संचालक होत आहेत. या परिस्थितीत पुन्हा नितीन पाटील यांना अध्यक्षपदी बसविले जाऊ शकते. कारभार मात्र मंत्रीद्वय व इतर मंडळी चालवू शकतात. मात्र नेतृत्वाची पोकळी भरायला आणखी काळ जाऊ द्यावा लागेल. तसेच केवळ कर्जवाटप व वसुली या एककलमी कार्यक्रमातून वेळ काढून संचालक मंडळाने बँकेला सर्वसामान्य सभासदांच्या विकासासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज आहे.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com