esakal | औरंगाबादच्या टाकळी कोलतेमधील किराणा दुकानाला भीषण आग, सत्तर लाखांचा माल जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

Grocery Shop Burned Aurangabad News

टाकळी कोलते येथील बसस्थानकावरच व्यापारी नितीन शांतीलाल कुंकुलोळ यांचे किराणा दुकान आहे.

औरंगाबादच्या टाकळी कोलतेमधील किराणा दुकानाला भीषण आग, सत्तर लाखांचा माल जळून खाक

sakal_logo
By
बाबासाहेब ठोंबरे

पीरबावडा (जि.औरंगाबाद) : टाकळी कोलते (ता.फुलंब्री) येथे किराणा दुकानाला आग लागून सर्व सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी (ता.तीन) पहाटे दोन वाजेदरम्यान घडली आहे. टाकळी कोलते येथील बसस्थानकावरच व्यापारी नितीन शांतीलाल कुंकुलोळ यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे कुंकुलोळ हे मंगळवारी (ता.दोन) रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. मात्र बुधवारी पहाटे दोन वाजता दुकानातून अचानक धूर निघत असल्याचे दुकानाच्या पाठीमागे राहत असलेले नितीन कुंकुलोळ यांच्या लक्षात आले.

तेव्हा त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुकानाला भीषण आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समोरच राहत असलेले माजी सरपंच विजय आहेर, पोलिस पाटील नारायण शिंदे यांना माहिती दिली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज दुकान मालक यांनी व्यक्त केला आहे. दुकानाला लागून जवळपास साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्री.कुंकुलोळ यांनी सांगितले.

किराणा दुकाना लगत असलेल्या कृषी सेवा केंद्राला सुद्धा आगीने वेढल्याने कृषी केंद्राचे सुद्धा नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग खूप भयंकर असल्याने संपुर्ण दुकानाची राख झाल्याने काहीच शिल्लक राहिले नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image