esakal | वाळूजमध्ये खासगी रुग्णालयाकडून होतेय आर्थिक लूट
sakal

बोलून बातमी शोधा

waluj

वाळूजमध्ये खासगी रुग्णालयाकडून होतेय आर्थिक लूट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूज (औरंगाबाद): वाळूज परिसरातील खासगी दवाखान्यातकडून उपचार करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दुप्पट दर आकारून ही उघड उघड लूट केली जात आहे. ही लूट थांबवून न्याय देण्याची मागणी एका रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे शुक्रवारी (ता.१६) केली आहे.

कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात बेड मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत अनेक खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले देऊन आर्थिक लूट सुरू आहे. विशेष म्हणजे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने दर पत्रक जाहीर केले आहे. असे असतानाही या दर पत्रकाला केराची टोपली दाखवत दामदुपटीने रुग्णांकडून वसूल केले जात आहे. वेळप्रसंगी त्यांना भावनिक ब्लॅकमेल केले जात असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात १२३ जणांचा मृत्यू, २४ तासांत सात हजार सातशे रुग्ण

वाळूज परिसरातील कृष्णा चांगदेव सोनवणे या तरुणाच्या एका ६५ वर्षीय नातेवाईकास न्यूमोनिया झाला होता. सोनवणे यांनी रुग्णाची कोविड टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी सोनवणे यांनी रुग्णाला २८ मार्च २०२१ रोजी सिडको वाळूज महानगर येथील वाळूज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गुरुवारी (ता.८) रुग्णालयातून रुग्णाला सुट्टी देताना हॉस्पिटलने १ लाख ६६ हजार रुपयांचे बिल रुग्णांच्या नातेवाईकांना दिले.

सर्व सामान्य कुटुंबातील सोनवणे यांना बिल पाहून चक्करच आली. डॉक्टर साहेब शासनाच्या नियमाप्रमाणे बिल आकारणी करा. अशी सोनवणे यांनी विनवणी केली. मात्र हे हॉस्पिटल माझे आहे, सरकारी नाही, मी दिलेल्या बिलाप्रमाणेच पैसे द्यावे लागतील, असा सज्जड इशारा हॉस्पिटल व्यवस्थापनाने सोनवणे यांना दिला. यावेळी सोनवणे यांनी निमुटपणे कसेतरी पैसे जमवून बिल भरून रुग्णाला दवाखान्यातून सुटी करून घेतली. त्यानंतर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना वाळूज हॉस्पिटलकडून होत असलेल्या आर्थिक लुटीची तोंडी तक्रार दिली. मात्र तोंडी तक्रार न करता लेखी तक्रार करण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

त्यामुळे कृष्णा सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.१६) लेखी स्वरूपात निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले. या निवेदनात असेही म्हटले आहे की, वाळूज हाँस्पिटल कडून जास्तीचे घेतलेले बिल मला परत देण्यात यावे. चौकशी करून डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

(बातमीदार- रामराव भराड)