Aurangabad : ‘तिसऱ्या डोळ्यां’नी केले दीडशेवर गुन्हे उघड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV

Aurangabad : ‘तिसऱ्या डोळ्यां’नी केले दीडशेवर गुन्हे उघड!

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मास्टर सिस्टीम इंटीग्रेटर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत शहरासह परिसरात ७०० कॅमेरे (सेफ सिटीचे) बसविण्यात आले आहेत. या ‘तिसऱ्या डोळ्यां’मुळे आजवर तब्बल दीडशेवर गंभीर गुन्हे उघडकीस आल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे, उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये सहा खुनांसह बेपत्ता झालेली पाच मुले, एक अत्याचार, वीस लाखांच्या बीएसएनएल केबल चोरीसह, मोटार अपघात, मंगळसूत्र चोरींसारख्या इतर तब्बल १५० गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांतर्गत बसविलेल्या सातशे कॅमेऱ्यांचे पोलिस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर (सीसीसी) आहे. ‘तिसऱ्या डोळ्यां’मुळे पोलिसांना गुन्हे उघड होण्यात मोलाची मदत झाली आहे.

शहरात मंगळसुत्र चोरट्यांचा सुळसुळाट असून अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात सेफ सिटीचे कॅमेरे मैलाचे दगड ठरले आहेत. अशा गुन्ह्यातील १४ हून अधिक आरोपी पकडण्यात पोलिसांना या कॅमेऱ्यामुळे यश आले आहे.

दररोज १५ ते १६ हजारांचा दंड

विशेष म्हणजे सीसीसीमध्ये बसणारे पोलिस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकी, इतर वाहनेही कॅमेऱ्याद्वारे झूम करुन पाहतात. विना क्रमांकाची वाहने ही गुन्हा करण्यासाठी खासकरुन मंगळसूत्र चोरीसारखे प्रकार करण्यासाठी सर्रास वापरली जातात. अशा वाहनांचे लोकेशन वाहतूक विभागाला देण्यात येते. सदर वाहतूकचा कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन अशा वाहनांना दंड आकारतो. दरदिवशी अशा वाहनांना जवळपास १५ ते १६ हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.

कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांवरही नजर

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या पॉईंटला (चौक) संबंधित कर्मचारी आहे की नाही हेही या कॅमेऱ्यातून सीसीसीमध्ये पाहता येते. अनेकवेळा कर्मचारी चौकात हजर राहत नाहीत, अशा वेळी सीसीसीमध्ये आढळून आल्यास वरिष्ठांद्वारे तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यास सूचना दिली जाते. त्यामुळे त्या त्या चौकातील वाहतूक कर्मचाऱ्यांवरही आता तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवली आहे.

लाईव्ह सीसीटीव्ही बघून टळली १५४ प्रकरणे

शहरातील संवेदनशील ठिकाणे, धार्मिक स्थळे तसेच जवळपास १५ पुतळ्यांजवळ आखलेल्या रिंगणाच्या आत कोणीही प्रवेश केला तर त्याची नोंद सीसीसीमध्ये होऊन आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्यावर कारवाई करणे सोपे जाते. आजवर अशा १५४ प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरे लाईव्ह पाहून नियंत्रण कक्षाला कळविल्याने अनर्थ टळले.

सेफ सिटीच्या तिसऱ्या डोळ्यामुळे उघड झालेले गुन्हे

गुन्हे उघड गुन्ह्यांची संख्या

खून ६

मोटार अपघात २८

मंगळसुत्र हिसकावणे १४

अत्याचार ०१

चोरी २४

निष्काळजीपणे वाहन चालविणे, (मृत्यू) १६

हरविलेल्या बॅग्ज, पर्स १३

व इतर असे दीडशे गुन्ह्यांचा समावेश आहे.