
औरंगाबाद : विस्तारीकरणात करावा २५ वर्षांचा विचार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत वेगाने विकसित होत आहे. त्यादृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करून चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा विचार करावा, अशा सूचना दिल्लीत झालेल्या बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी केल्या. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने विमानतळ विस्तारीकरणासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची नवी दिल्ली येथील राजीव गांधी भवनात भेट घेतली.
‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, उपाध्यक्ष नितीन गुप्ता, उत्सव माछर, दुष्यंत आठवले, अभिषेक मोदानी, औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकणी आणि विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विमानतळ विस्तारीकरणाबाबत मुकुंद कुलकर्णी यांनी प्रेझेन्टेशन केले.
बैठकीत प्रामुख्याने पाच मुद्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा म्हणजे, औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत वेगाने विकसित होत आहे. त्यादृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करून विस्तारीकरणाचा विचार करावा. त्याचबरोबर कोरोनापूर्वी औरंगाबादमधून १७ विमाने उड्डाण घेत होती. आता ही संख्या अत्यल्प आहे. ही संख्या पुन्हा पूर्वपदावर आणून नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले जावे. औरंगाबादमध्ये नाइट पार्किंगची सुविधा निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात येण्यासाठी आणि सकाळी लवकर शहराबाहेर जाण्याची सोय होईल. कारण, आजघडीला औरंगाबादची विमानसेवा सायंकाळी चारनंतर आहे.
त्याचबरोबर औरंगाबाद येथे इमिग्रेशन सुविधा सुरू करण्यात यावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रोत्साहन मिळेल. यासंदर्भात गृहमंत्रालयाशी संवाद साधावा. याशिवाय एअर कार्गो सेवेचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्याबाबत चर्चा झाली. इमिग्रेशनचे सहसचिव (गृहमंत्रालय) सुमंत सिंग, औषध नियंत्रक प्रमुख व्ही.जी. सोमाणी, विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार भारद्वाज, कार्यकारी संचालक (ऑपरेशन) विवेकानंद चौरे, फ्लाय बिगचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया, संजय केणेकर, भगवान घडमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इमिग्रेशनला तत्त्वतः मान्यता
यावर उत्तर देताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, की औरंगाबाद येथील विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर इमिग्रेशन सुविधा सुरू करता येऊ शकेल. यासाठी गृहमंत्रालय विभागाशी चर्चा करू. फ्लाय बिग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया यांच्याशी औरंगाबाद ते हैदराबाद या विमानसेवेशिवाय इतर शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय भारतातील उडान शहरांशी औरंगाबादला विमान सेवेशी जोडण्यासाठी औरंगाबादच्या संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा. ज्यामुळे विमानसेवा बळकट होईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून निष्पन्न झाले.
Web Title: Aurangabad Chikalthana Airport Expansion Finance Minister Dr Bhagwat Karad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..