Aurangabad : शहराने अनुभवला खगोलीय उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad city solar eclipse

Aurangabad : शहराने अनुभवला खगोलीय उत्सव

औरंगबाद : दिवाळी उत्सवादरम्यान मंगळवारी (ता.२५) सायंकाळी सूर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी बीबी का मकबरामागील गणेश टेकडीवर खगोलप्रेमींनी आकाशातील उत्सवाचा अनुभव घेतला. तब्बल ७० वर्षांनंतर सूर्यास्तावेळी ग्रहणाचा योग जुळून आल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई सुरू आहे. तर याच काळात आकाशातील खगोलीय दीपोत्सव पाहण्याची मंगळवारी पर्वणी विज्ञानप्रेमी, खगोलप्रेमी आणि नागरिकांना मिळाली. बीबी का मकबरामागे असलेल्या डोंगररांगापैकी गणेश टेकडीवर ही व्यवस्था करण्यात आली होती.

साडेतीन वाजता बीबी का मकबरा येथे सर्व खगोलप्रेमी जमा झाले आणि तिथून सर्वजण गणेशटेकडी येथील निरीक्षणस्थळी जमले. या खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजुती, अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या अनुषंगाने हौशी, जिज्ञासू खगोल अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांसाठी ‘खंडग्रास सूर्यग्रहण निरीक्षण'' उपक्रमाचे आयोजन केले होते. या विशेष खगोलीय उपक्रमाचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, निसर्ग मित्र मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन ॲण्‍ड एज्युकेशनल अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले होते.

शहरात दिसले ८० मिनिटे सूर्यग्रहण

मराठवाड्यातील शहरांच्या वेळा पाहिल्यास औरंगाबाद येथून सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरुवात झाली. ग्रहणमध्य सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटाला झाला. त्यावेळी चंद्रबिंबाने सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकला. तर सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त झाला. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची हौशी छायाचित्रकारांना पर्वणी ठरली.

सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी ग्रहणस्पर्श झाला. ग्रहणा मध्य सायंकाळी ५.४२ वाजता झाला, त्यावेळी सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकला गेला. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य नागरिकांनी अनुभवले. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६.०९ वाजता सूर्य पश्‍चिमेला दिसेनासा झाला. तब्बल ७० वर्षांनंतर सूर्यास्तावेळी ग्रहणाचा योग जुळून आला.

- श्रीनिवास औंधकर, संचालक,एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र

टॅग्स :Aurangabad Newssciencesun