
औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुणीचा भरदुपारी चिरला गळा!
औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुणीला माथेफिरूने फरपटत नेत गळा चिरून तिचा निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास देवगिरी महाविद्यालयाजवळ एका रिकाम्या प्लॉटवर घडली. सुखप्रीतसिंग ग्रंथी कौर ऊर्फ कशीश (वय १८) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झालेला आहे. वेदांतनगर पोलिस ठाण्यात मृत तरुणीचा भाऊ हरप्रीत सिंग ग्रंथी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सुखप्रीतसिंग ऊर्फ कशीश ही शनिवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान देवगिरी महाविद्यालयात गेली होती. या ठिकाणी ती बीबीए प्रथम वर्षात शिकत होती.
दुपारी दोनच्या दरम्यान कशीशच्या मैत्रिणीने फोन करून तिचा भाऊ हरप्रीतला घटनेची माहिती दिली. त्यानंतर हरप्रीतसिंग हा वडिलांसोबत घटनास्थळी आला, त्यांनी कशीशला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. संशयित मारेकरी ने कशीशच्या गळ्यावर धारदार हत्याराने चार वार केले, त्यात कशीशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी चा शोध घेण्यासाठी वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या दोन टीम आणि गुन्हे शाखेची एक टीम रवाना करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप हे करत आहे. आरोपी हा एका गॅरेजमध्ये काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.
शहरात दोन दिवसांत खुनाची तिसरी घटना
औरंगाबाद शहरात गेल्या दोन दिवसांत खुनाची ही तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी नारेगाव भागात एका तरुणीला तिच्या प्रियकराने घरी बोलावून तिचा खून केला. त्यानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान कटकटगेट येथील पाण्याच्या टाकीजवळ एका भंगार विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या पाठोपाठ शनिवारी ही घटना घडली.
अशी घडली घटना
महाविद्यालयाच्या परिसरात आरोपीने कशीशच्या दुचाकीची चावी आणि मोबाइल हिसकावून घेतला होता. त्यानंतर चावी परत देण्यासाठी रचना कॉलनी भागातील कॅफेमध्ये बोलावले. या ठिकाणी आरोपी आणि कशीश यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी याने कशीशला कॅफे समोरच्या चौकातून अक्षरशः ओढत रचनाकार कॉलनीच्या एका रिकाम्या प्लॉटवर नेले. याच ठिकाणी तिचा गळा चिरला. कशीशची मैत्रीण ही त्या प्लॉटजवळ गेली असता तिच्यावरही शरणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Aurangabad College Girl Murder Due To One Sided Love
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..