
औरंगाबाद : ‘झेडपी’च्या माजी अध्यक्षांसह काँग्रेस तालुकाध्यक्ष भाजपमध्ये
औरंगाबाद : राज्यातील राजकीय घडामोडींपाठोपाठ औरंगाबाद तालुक्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक असलेले तालुकाध्यक्ष रामराव शेळके आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीना शेळके यांनी गुरुवारी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शेळके दाम्पत्य भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला तालुक्यात मोठे खिंडार पडले असून भाजपला मोठी बळकटी मिळाली आहे.
भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, की रामराव शेळके यांच्यामुळे भाजपची ताकद वाढेल. या प्रवेशाबरोबर इतरांचेही प्रवेश होणार आहेत. यासाठी एक मोठा कार्यक्रम घेऊन हे प्रवेश देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची उपस्थिती राहील. या प्रवेशाविषयी प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना कळविल्याची माहिती आमदार बागडे यांनी दिली.
आमदार बागडे, भाजपचे सरचिटणीस राजू शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष रामूकाका शेळके, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, सरसाताई वाघ, दामूअण्णा नवपुते, सजनराव मते, मधुकर वालतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘नेत्यांच्या जवळच्यांनी पक्ष सोडण्यासाठी प्रवृत्त केले’
काँग्रेसने मला तालुकाध्यक्ष, सभापतिपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. चांगलं सुरू असतानाच, जाणून-बुजून त्रास देणे, तू आम्हांला नकोय, अशाप्रकारचे वातावरण तयार केले गेले. गेली पाच वर्षे पक्षाने संधी दिल्याने मी तालुकाभर काम केले. गेल्या वर्षभरापासून माझ्या कामाचा त्रास काँग्रेसमधील काहींना वाटू लागला. मला पक्ष सोडण्याची इच्छा नव्हती, काही नेत्यांच्या जवळच्या लोकांनी मला पक्ष सोडण्यासाठी प्रवृत्त केले. वारंवार खोटे आरोप करत होते. पक्षाचे सोशल मीडिया चालविणारे चुकीची माहिती देत होते. त्यामुळे विनाअट मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. काळे यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केल्याचेही रामराव शेळके यांनी सांगितले.
Web Title: Aurangabad Congress Taluk President With Former President Joins Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..