तू चाल पुढं तुला...रे गड्या 250 मैल प्रवास video

Aurangabad-Corona virus caused laborers to walk 250 miles,
Aurangabad-Corona virus caused laborers to walk 250 miles,

औरंगाबाद -  ‘‘मागच्या पाच दिवसांपासनं चालतोय, अजून पाच दिवस गावांत जायला लागतील. बायका पोरं कालपासून उपाशी हायं, रस्त्याने कोणी कायबी दिलं तर घ्यायचं. अन् पुढं चालत राहायचं सुरु हायं, मायबाप गावाकडं वाट बघत्यात, रडून रडून त्यांच्या डोळ्याचं पाणी सुकलंय... पोलिस म्हणत्यात जावू नका; पण नाय गेलो तर मायबाप तीळ तीळ मरत्याल, म्हणून दिवसरात्र चालत आहोत’’ असं संजय डाकोरे यांनी सांगीतले. 

कोरोनाच्या संचारबंदीने वाशिम जिल्ह्यातील अनेक मजूर परजिल्ह्यात अडकले आहेत. काम संपले, हातातील पैसा संपला, अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न अनेक मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. अशातच पाच ते सहा कुटूंब पायी प्रवास करून आपले स्वत:चे गाव गाठत असल्याचे औरंगाबादेत दिसून आले. वाशिम जिल्ह्यातील काही मजूर कांदे काढणे, खुरपणी, कोळपणी, द्राक्षे, टोमॅटोच्या तोडणीच्या कामासाठी श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यात गेले होते. परंतु, कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले.

>

 काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे? असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. श्रीगोंदा तालुक्यातून दोनशे किमीचा पायी प्रवास करून काही मजूर औरंगाबाद शेंद्रा एमआयडीसी परिसरात दिसून आले. पाच दिवसांपूर्वी निघालेले हे मजूर पायी प्रवास करून रविवारी सकाळी शेंद्रा एमआयडीसी भागात चालताना आढळले. मजुरीचे काम पूर्ण झाले. तसेच तेथे निवास व अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. गावाकडे परतण्याची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याचे पंजाबराव या मजुराने सांगीतले. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीत पायीच प्रवास करून स्वत:चे गाव गाठायचे, असा निर्णय घेतला. 

डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन श्रीगोंदा ते नगर, शनीशिंगणापूर, नेवासा मार्गे औरंगाबादला दिवसरात्र पायी चालत पोहोचले. दरम्यान पायी प्रवास केलेले हे मजूर प्रचंड थकल्याचे दिसत होते. सोबत चार पाच लहानमुल भुकेने व्याकूळ झालेले होते. तर पायी चालल्यामुळे बायका, मुलांचे पाय सुजलेले होते. 
काही बायकांनी पायाला प्लॅस्टिकच्या बॉटल, काड्या बांधल्या होत्या. याबाबत त्यांना विचारले असता, पारुबाई डाकोरे यांनी सांगितले ‘‘दादा.. दोनशे मैल पायी चालत आलोय.. चपला तुटल्यात, उन्हामुळं पाय भाजतात म्हणून हे पायाला बांधलय, गाड्या येत्यात जात्यात पण कोणी गाडीत घेत न्हाय.

 पोरांचे पाय सुजलेत, अन्न पाण्यावाचून तरसत्यात पण काय करणार? पैसा शिल्लक न्हाय, त्यामुळं आपला गावचं बरा म्हणून निघालो गावाकडं, अजून जालना, सिंदखेडराजा, लोणार, रिसोड नंतर वाशीम येणार हाय. त्यामुळं चालतोय उठतबसत’’ असं म्हणत त्यांनी घामाघूम झालेला चेहरा साडीच्या पदराने पुसला, अन् पुढे चालू लागल्या. याबाबत शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांना माहिती मिळाली. त्यांनी या कुटुंबाला दहा डझन केळी, तसेच दोन हजार रुपये दिले. पाच मिनिटात दहा डझन केळी फस्त करुन हे मजूर मार्गस्थ झाले. 
-- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com