औरंगाबाद : प्रेमी युगुलाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide case

औरंगाबाद : प्रेमी युगुलाची आत्महत्या

औरंगाबाद : प्रेमी युगुलाने हॉटेलात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रेल्वेस्थानक भागातील एका बड्या हॉटेलात २ ऑगस्टच्या रात्री उघडकीस आली. विशेष म्हणजे, दोघेही औरंगाबाद शहरातच राहत होते, असे असतानाही हॉटेलात रूम बुक करून चक्क तीन दिवस राहून आत्महत्या का केली, याचे कोडेच आहे. सागर राजेश बावणे (२१ वर्षे, रा. संभाजी कॉलनी, एन-६, सिडको) आणि सपना अंकुश खंदारे (२१ वर्षे, सर्व्हे क्र. ५२, लक्ष्मीनगर, रेल्वेस्थानक बाळापूर रस्ता) अशी मृतांची नावे आहेत. सागरने रूममधील फॅनला गळफास घेतला तर सपना मृतावस्थेत बेडवर आढळली, तिच्या तोंडातून फेस आल्याने विषारी औषधाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांत नोंद करण्यात आली.

वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागरचे बीए द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झाले असून सपना बारावीत शिक्षण घेत होती. सागरचे वडील माशांच्या जाळ्याला मणी (वेट) बसविण्याचे काम करतात तर सपनाचे वडील हे मजुरी करतात. विशेष म्हणजे सागरने वडिलांना कुठे जात आहे, कधी वापस येणार याविषयी काहीच कल्पना दिली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तर सपना ही बेपत्ता असल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात होती. सागरला दोन लहान भाऊ आहेत. तर सपनाला एक मोठी आणि एक लहान बहीण आहे. दोघांची ओळख असल्याची कुणकुण कुटुंबीयांना माहिती असल्याचे बोलले जात आहे. दोघे मित्र-मैत्रीण होते की प्रेम युगुल यासंदर्भात ठोस माहिती समोर आली नसली तरी पोलिसांनी प्रेमी युगुल असल्याचा माहितीला दुजोरा दिला आहे. सागर याने २० जुलै रोजी हॉटेलमधील एक रूम बुक केली होती. त्या दिवशी तो एकटाच राहिला, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जुलै रोजी सपना हॉटेलमध्ये आल्याची इंट्री आहे.

आत्महत्येचा प्लॅन

सागरने नायलॉन दोरीने गळफास घेतला होता. तो गळफास घेतलेल्या अवस्थेत तर सपना ही बेडवर पडलेल्या अवस्थेत होती. तिच्या अंगावर पांघरून टाकलेले होते. त्यामुळे तिची आत्महत्या असेल का...असे प्रश्न पोलिसांना उद्‍भवले आहेत. तसेच गळफास घेण्यात आलेली दोरी सागरकडे हॉटेलात आधीच कुठून आली यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. रूम बुक केल्यानंतर दोन दिवस कोणीच बाहेर आले नाही, शिवाय काही खाण्यापिण्याच्या ऑर्डर हॉटेल स्टाफला दिल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे आत्महत्या नेमकी कोणत्या दिवशी केली याचा मात्र आणखी उलगडा झाला नाही. दोन दिवस रूममधील दोघे कोणालाच न दिसल्याने स्टाफची कुजबुज सुरू झाली, त्यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या वेदांतनगर पोलिसांना कळविले. त्यावेळी निरीक्षक सचिन सानप यांच्यासह एपीआय अनिल कंकाळ, उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या चमूने धाव घेतली. स्टाफच्या मदतीने रुमचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यावेळी रूममधील टीव्ही सुरू होता.

त्याचा फोन होता फ्लाइट मोडवर

रूममध्ये पोलिसांना सागरचा फ्लाइट मोडवर ठेवलेला मोबाइल सापडला. पोलिसांना त्यातून एक क्रमांक मिळाला. तो सागरचा लहान भाऊ करण याचा होता. पोलिसांनी त्यावर संपर्क केल्याने मृत हा सागर असल्‍याचे निष्पन्न झाले. सपनाचा मोबाइल तिच्या घरीच होता. ती बेपत्ता असल्याची नोंद आढळल्याने ती सपनाच असल्याचे समोर आले. पुढील तपास उपनिरीक्षक सुधाकर पाटील करत आहेत.

Web Title: Aurangabad Couple Committed Suicide In Hotel Near Railway Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..