esakal | हृदयद्रावक! दोन चिमुरड्या लेकरांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक! दोन चिमुरड्या लेकरांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हृदयद्रावक! दोन चिमुरड्या लेकरांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : आपल्या दोन लेकरांसह आईने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी (ता.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेवराई तांडा (ता.औरंगाबाद) येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागील एका शेतात घडली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. वैशाली रवींद्र थोरात (वय २७, रा. गेवराई ता.औरंगाबाद)), असे विवाहितेचे नाव असून मुलगी आरोही (वय ६ ), मुलगा पियुष (वय ३ ) अशी मृत लेकरांची नावे आहेत. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, गेवराई तांडा येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागील एका शेतातील विहिरीत महिलेने आत्महत्या केल्याचा माहिती गुरुवारी ११ वाजेच्या सुमारास माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कुंभार, बिट जमादार काशिनाथ लुटे, संपत राठोड, दीपक सुरासे, महानगर पालिका फायर ब्रिगेडचे चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने वैशालीसह दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून पुढील उत्तरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, सदर विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नसून कौटुंबिक कलहावरून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करु, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विशाल नेहूल यांनी भेट देऊन माहिती घेतली. वैशाली यांच्या माहेरच्या मंडळींनी घातपाताच संशय व्यक्त केला असून सासरच्या लोकांवर गुन्हा दखल करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.