esakal | महापालिकेचा फार्मासिस्ट निलंबित, रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरण

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र
महापालिकेचा फार्मासिस्ट निलंबित, रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरण
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन चोरी गेले होते. या प्रकरणी महापालिकेने मुख्य फार्मसिस्ट बी. डी. रगडे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. तसेच प्रणाली कोल्हे या कंत्राटी साहाय्यक फार्मसिस्टची हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची महापालिकेची तयारी सुरू होती. महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर हॉस्पिटलमधून ४८ रेमडिसिविर इंजेक्शन गहाळ झाल्याचे प्रकरण तीन दिवसांपूर्वी उघडकीस आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य स्टोअर रुम भवानीनगर येथे आहे. या स्टोअर रुममधून २० एप्रिलला रेमडेसिविर इंजेक्शनचे २६ बॉक्स मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते.

हेही वाचा: वाळूजजवळ तरुण धक्कादायक अवस्थेत आढळला, क्षुल्लक कारण बेतले जीवावर

त्यापैकी एक बॉक्स २४ एप्रिलला उघडण्यात आला असता त्यातील ४८ रेमडिसिविर इंजेक्शन ऐवजी एमपीएस इंजेक्शन असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणी प्राथमिक चौकशी करून प्रशासनाने भांडार विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, मुख्य फार्मासिस्ट बी. डी. रगडे, साहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे, दीपाली साने व अनंत देवगिरीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या सर्वांनी खुलासा केला. त्याचा अहवाल प्रशासकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी रगडे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. तसेच प्रणाली कोल्हे कंत्राटी कर्मचारी असल्याने हकालपट्टी करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. या दोघांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचेही आदेश प्रशासकांनी दिले आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

img

मेल्ट्रॉनमध्येही होणार चौकशी

मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधून हे ४८ इंजेक्शन गायब झाले असतील? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरही प्रशासन विचार करत असून, चौकशी केली जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.