‘पप्पाने बाहरसे पत्थर लाके मम्मी के सर में मारा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad crime update husband killed wife

‘पप्पाने बाहरसे पत्थर लाके मम्मी के सर में मारा’, लेकरानंचं सांगितली दास्ताँ

औरंगाबाद : दोन बायका असलेल्या ट्रकचालक पतीने घर रिकामे करण्याच्या कारणावरुन लेकरांसमोरच पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार केले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बायजीपुरा, इंदिरानगर भागात घडली. अंजुम खलील शेख (३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आरोपी मारेकरी पतीला जिन्सी ठाण्याच्या पथकाने वैजापूर तालूक्यातील निजामपूर गावातून रविवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या असून खलील शेख ईस्माईल शेख (४२, रा. बायजीपुरा, गल्ली नं. २१) असे त्या पतीचे नाव आहे.

मुळ रा. गारज (ता. वैजापूर) येथील रहिवासी असलेल्या खलील शेख याचा २००९ साली अंजूमसोबत दुसरा विवाह झाला होता. त्यापूर्वी परवीन शेख हिच्यासोबत विवाह झाला होता. विशेष म्हणजे ही बाब अंजूमसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना समजली होती. अंजूमचा भाऊ रहीम करीम शेख (३४, रा. आयआरबी कॅम्प, सातारा परिसर) हे राज्य राखीव दलामध्ये नोकरीला आहेत. खलील हा ट्रक चालक आहे.

अंजूम आणि खलील यांना फैजान (९) व फरहान (७) अशी दोन मुले आहेत. अंजूमशी लग्न झाल्यानंतरही खलील वैजापूरातील पत्नी परवीन हिच्याकडे देखील येणे-जाणे करीत असे. अंजूम व खलील यांच्यात काही दिवसांपासून घर रिकामे करण्यावरुन वाद सुरु होता. तसेच तो अंजूमच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर संतापलेल्या खलीलने घराबाहेरून मोठा दगड आणून तो मुलांसमोरच पत्नी अंजूमच्या डोक्यात घातला.

तीने आणला चहा, तर याने दगड!

अंजूमवर उपचार सुरु असताना भाऊ रहीम यांनी भाचा फैजानकडे घटनेबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, ‘सुबह दस बजे के वक्त मम्मी हमे चाय दे रही थी, तब पप्पा और मम्मी आपस में घर खाली करने के बारे में बात कर रहे थे, तब पप्पाने बाहर से पत्थर लाके मम्मी के सर मे मारा’, अशी माहिती दिली. त्यावरुन रहीम यांनी जिन्सी पोलिसात खलीलविरुध्द तक्रार दिली. वैजापूरला पहिल्या बायकोच्या घरातून खलीलला अटक केली. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या पथकातील सहायक फौजदार संपत राठोड, सुनील जाधव, नंदूसिंग परदेशी, नंदलाल चव्हाण यांनी ही कारवाई केली. पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक राजेश मयेकर करत आहेत.

नातेवाईकांची धावाधाव पण...

दगडाच्या जोरदार फटक्याने अंजूम जागीच कोसळली. ही माहिती आसपासच्या नागरिकांनी बारामती (जि. पुणे) येथील तमन्ना बागवान या बहिणीला कळवली. तमन्नाने याची माहिती भाऊ रहीम करीम शेखला दिली. दरम्यानच्या काळात रहेबर नावाच्या मुलाने रहीम यांना फोन करून तुमच्या बहिणीला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेत असल्याचे कळवले. त्यामुळे रहीमने पत्नी सायमासह रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी अंजूमच्या नाका-तोंडातून व कानातून रक्त वाहत होते. अंजूमची प्रकृती गंभीर असल्याने एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला घाटीमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, तिला घाटीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री अंजूमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Aurangabad Crime Update Husband Killed Wife

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top