
वेळीच टाळूया ‘सायबर बुलिंग’चा धोका
औरंगाबाद : सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये बुलिंग (रॅगिंग अथवा दादागिरी) करण्याचे प्रमाण वाढले आहे. संगणक सुरक्षा कंपनी ‘मॅकॅफी’ने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, सायबर बुलिंगला बळी पडणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वांत वर आहे. विशेषतः कोरोना काळात आणि त्यानंतर सायबर बुलिंगचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पालक-मुलांमधील संवाद कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचेही अहवालात नमूद आहे.
या अहवालानुसार, दहा वर्षांच्या तीन मुलांपैकी एकापेक्षा जास्त मुलांना सायबर, लैंगिक छळ आणि शारीरिक हानीचा सामना करावा लागतो. जगात सायबर गुंडगिरीची प्रकरणे भारतात सर्वाधिक घडत आहेत. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, टॅब मुलांच्या हातात पालकांनी दिला असला तरी मुले त्याचा कशापद्धतीने वापर करतात, याची पुसटशी कल्पनादेखील पालकांना नाही. पालकांना पत्ता लागू नये म्हणून अनेक शाळकरी मुलांचे फेक अकाउंटवरून व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्टाग्राम अकाउंट सुरू आहे. अशा सोशल मीडियावरून मुलांचे बुलिंगचे प्रमाण वाढत आहे. सायबरतज्ज्ञ नीरज सोळंकी यांनीही शाळकरी मुलांमधील वाढत्या ‘सायबर बुलिंग’ला दुजोरा दिला. शाळा, महाविद्यालयांमध्ये एखाद्याला टार्गेट करून त्रास देणे, आक्षेपार्ह मजकूर टाकणे, त्रास देण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. यामध्ये जितका दोष मुलांचा आहे तितकाच पालकांचा सुद्धा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्वेक्षणात काय म्हटलेय?
सर्वेक्षणात जगातील दहा देशांतील ११ हजार ६८७ पालक अन् विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये ७० टक्के भारतीय मुलांनी नोंदवले, की त्यांना अनोळखी व्यक्तीकडून सायबर धमकी दिली जाण्याची अधिक शक्यता वाटते. तर ४५ टक्के मुलांनी कबूल केले की, त्यांनी सायबर धमकीचे अनुभव पालकांपासून लपविले आहेत. यामध्ये पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे कारण असू शकते.
अशी एक घटना...
शहरातील एका वकिलाच्या मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून गोडीगोडीत कुटुंबीयांचे मोबाइल क्रमांक व तिचा फोटो एका मुलाने मिळवला. मुलीचे फोटो घेऊन एडिट करून ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच इन्स्टाग्रामवर खाते तयार करून त्यावर मुलीचा फोटो प्रोफाइलवर ठेवला. त्या फोटोवर अश्लील मजकूर टाकून पोस्ट करत मोबाइल देखील हॅक केला. पुढे त्याने मुलीच्या कुटुंबीयांना बदनामी करण्याची धमकी देत दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याच्या धमक्यांचा मानसिक त्रास होऊ लागल्यामुळे अखेर वकिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. सायबर बुलिंगसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शिक्षिकेवरही बेतला होता प्रसंग
इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून २०१९ मध्ये पुण्यातील शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा प्रकारही समोर आला होता. शिक्षिकेला इन्स्टाग्रामवर तरुणाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. पुढे दोघांची ओळख, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे त्याने शिक्षिकेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. शिक्षिकेने होकार दिला. एप्रिल २०१९ मध्ये शिक्षिका तरुणाला भेटण्यासाठी औरंगाबादेत आली. त्यावेळी संबंधित तरुणाने तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर तो पुण्यात जाऊन पीडितेला धमाकावून शारीरिक संबंध ठेवत होता, पीडितेकडे पैशांची मागणी करत होता. बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने त्याला सुमारे ६० हजार रुपयेही दिले. त्यानंतर एक जुलैला तरुण पुण्याला गेला. त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला.
असे आहे प्रमाण
४४ % ः अभद्र भाषा
४२ % ः अफवा
३७ % ः फोटोचा चुकीचा वापर
३३ % ः इंटरनेट सुरक्षा
२९ % ः कुणाला त्रास देणे
उपाय काय?
सायबर धोक्यांची मुलांना जाणीव करून द्या
मुलांशी मनमोकळेपणाने सुसंवाद ठेवा
बुलिंगच्या त्रासाला सामोरे जात असेल तर गप्प न राहता आवाज उठवायला सांगा
आपली मुले मोबाइलवर काय पाहतात, काय मेसेज पाठवतात, कुणाशी बोलतात याकडे लक्ष ठेवा
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की १३ ते १५ वर्षांच्या मुलामुलींसोबत सायबर बुलिंग झाले आहे. फेक अकाउंटच्या माध्यमातून मुलांना धमक्या दिल्या जातात. मुले घाबरून पालकांना याबाबत कळवत नाहीत. परिणामी, ते डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे आपली मुले इंटरनेटवर काय पाहतात, कुणाशी बोलतात याकडे दुर्लक्ष करू नका.
-नीरज सोळंकी, सायबरतज्ज्ञ
मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण, योगा, ध्यानधारणा करावी. नामस्मरणाने मन स्थिर राहून वाचन केलेले लक्षात राहते. नामस्मरणाने फायदेच फायदे होतात, फक्त नैतिकता हवी. आध्यात्मिक विचाराने सर्व समस्यांचे समाधान मिळते. विभीषणासारखी सत्ता, सुदाम्यासारखी संपत्ती, ध्रुवासारखे पद, वाल्यासारखी प्रतिष्ठा, अर्जुनासारखा लौकिक, तुळशीसारखा मान, महावीरांसारखे ध्यान, हनुमंतासारखे आयुष्य मिळते.
- राष्ट्रसंत आचार्य पुलकसागर महाराज