Aurangabad : धनगर मेळाव्यात रंगला कलगीतुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : धनगर मेळाव्यात रंगला कलगीतुरा

औरंगाबाद : हर्सूलच्या हरसिद्धी मैदानावर रविवारी (ता.६) पाच तास आक्रोश मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले.

माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर मेळावा झाला. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीला घ्यायचे माहीत होते. माझ्या ओबीसी मंत्रालयाच्या वतीने ओबीसींचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहेत. धनगर समाजासाठी एक हजार कोटींच्या निधीच्या संदर्भात देखील हा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून सोडवू असे म्हणाले. तर धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये देण्याच्याबाबत अध्यादेश देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काढला होता.

मात्र, त्यानंतर युती सरकार गेले. अतुल सावेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तोडत फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा केली. पण धनगर समाजाला आरक्षण मिळालेच नाही, असा प्रतिहल्ला केला. यावेळी जिल्हाप्रमुख रंगनाथ राठोड, अरुण रोडगे, बाळासाहेब जानराव, धरम पवार, कैलास गायके, कपिल दहेकर, दत्तात्रेय खेमनर, अनंत बनसोडे, रामेश्‍वर पाटील, सुनील दुधे, श्‍याम गुंजाळ, रामनाथ मंडलिक, शिवाजी वैद्य, सजंय फटाकडे, साईनाथ ढोबळे, संतोष सुरे, कैलास वाणी यांच्यासह राज्यातून मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते.

भुमरेंची टीका

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर महाविकास आघाडीच्या काळात कुठलाही प्रश्न सुटला नसल्याची टीका भुमरे यांनी केली.

सरकारमध्ये काय काम केले ः दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते. मग त्यांनी काय काम केले? फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा केली. मात्र, त्यांच्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळालेच नाही अशी टीकाही दानवे यांनी केली

धनगर आरक्षणासाठी प्रयत्नशील ः डॉ. कराड

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी धनगर समाजाच्या प्रश्नावर बोलताना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.