Aurangabad : थेट सरपंच निवडीने वाढली चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Aurangabad News: थेट सरपंच निवडीने वाढली चुरस

फुलंब्री : स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी गावाचा सरपंच असणे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण तापू लागले आहे.

सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणूका या कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. गुलाबी थंडीतही उमेदवार आता रात्रभर पायाला भिंगरी बांधून मतदारांच्या घरी दारोदार फिरू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहे.

सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत सक्रिय

यंदा राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप-शिंदे गटाने जनतेतून सरपंचपद असणार असल्याचे घोषित केल्याने राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागणार आहे. जनतेतून सरपंचपद असल्याने फुलंब्री तालुक्यात काँग्रेस, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

गावात भावकीच्या बैठकांवर भर

गावोगाव विविध पक्षांच्या माध्यमातून वॉर्डनिहाय बैठका घेण्यासाठी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त ऐन थंडीच्या काळातही रात्रीच्या वेळी बाहेर पडू लागल्याचे दिसत आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार यादी गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत उमेदवारी अर्ज भरले आहेत. गावातील भावकीच्या बैठका मतदान घेण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

जि.प., पं.स.निवडणुकीची रंगीत तालीम

ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर लगेचच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि इतर संस्थाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा परिणाम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर होऊ शकतो. यामुळे गावातील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत ताब्यात घ्यायचीच हा चंग बांधला आहे. प्रामुख्याने मोठी महसूल असणारी पिरबावडा, आळंद, पाथ्री ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.