Aurangabad : शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Divisional Commissioner Sunil Kendrekar

Aurangabad : शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी

औरंगाबाद : येथील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये वैज्ञानिक, परमवीरचक्र विजेत्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात नाहीत. मात्र, जयंत्या साजऱ्या केल्याचे खोटे अहवाल सीईओंच्या सहीनिशी शिक्षण विभाग करते, असा आरोप विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केला आहे. शिक्षण विभागाचे गचाळ कामाचे वाभाडे काढणारी केंद्रेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. औरंगाबाद शिक्षण विभाग काय काम करते हा संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

केंद्रेकर यांनी कन्नड तालुक्यातील हतनूर गावातील शाळेला भेट दिली. यानंतर शाळा कशी नसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे हतनूरची शाळा आहे. शाळेत लायब्ररी, प्रयोगशाळाही नव्हती. प्रयोगशाळेचे कपाटाला जाळे लागलेले आढळले. तसेच वैज्ञानिकांची जयंती साजरी करायला सांगण्यात आली होती. मात्र, शाळेत कोणतीही जयंती साजरी होत नव्हती. कोणत्याही वैमानिकांचा फोटो नाही, परमवीरचक्र विजेत्यांचा फोटो असल्याचे केंद्रेकरांना आढळले. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांना दोन शाळा तपासण्याचे आदेश दिले. त्या ठिकाणी हीच परिस्थिती आढळल्याचा अहवाल आला.

यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची नावे सांगायला सांगितले तर त्यांनी पंडित नेहरू, महात्मा गांधी अशी उत्तरे दिली. शाळांमध्ये वैज्ञानिक, परमवीरचक्र विजेत्यांचे फोटोच नाही अन् शिक्षक तसेच शिक्षणाधिकारी जयंत्या साजऱ्या केल्याचे खोटे अहवाल सादर करत आहेत, असे केंद्रेकर यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शिक्षणाच्या परिस्थितीकडे स्वत: सीईओंनी लक्ष द्यावे. सीईओ हे आयएएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असल्याचे केंद्रेकर म्हणत आहेत.

शिक्षण विभागाने घेतली तातडीने बैठक

विभागीय आयुक्तांनी सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शास्त्रज्ञ, परमवीरचक्र विजेत्यांची नावे, विविध प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांना आहे की नाही, याची तपासणीचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.२०) सुटी असताना देखील शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची तातडीने बैठक घेत तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

शिक्षण विभागाचे दुखणे

शिक्षण विभागात जवळपास दोन हजार शिक्षकांच्या जागा रिक्त; केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल ५०-५० टक्के पदे रिक्त आहेत. यासह गणित, विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांचे २५ टक्के पदे रिक्त आहेत. अनेक शिक्षक निवडणुकीच्या कामाचे निमित्त सांगून तहसील कार्यालयालयात पडून असतात. असे असताना विभागीय आयुक्त मात्र गुणवत्तापूर्वक शिक्षणाची अपेक्षा ठेवत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यायचे कसे? असा सवाल काही शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.