Aurangabad : जिल्हाधिकाऱ्यांकडून ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad E office system

Aurangabad : जिल्हाधिकाऱ्यांकडून ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू

औरंगाबाद : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दोन वर्षांपासून बंद असलेली ई-ऑफिस प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपर्यंत ई-आॉफिस प्रणालीचा वापर केला जात होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणाऱ्या विविध कामांच्या संचिका कधी दाखल झाल्या. सध्या कोणत्या विभागात, कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर किती दिवस संचिका होती. याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे संचिका आल्यानंतर मिळत होती. या पद्धतीमुळे संचिकांचा टेबलावरचा प्रवास गतिमान झाला होता.

कोणतेही कारण देऊन संचिका थांबविणे शक्य नव्हते. तसे झाल्यास संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा सादर करावा लागत होता. या प्रणालीमुळेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून संचिका पुढे निघाल्यानंतर मंजुरीसाठी आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागत नसे. मात्र प्रशासनाला गतिमान करणारी ही प्रणाली दोन वर्षांपासून बंद पडली होती.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर आस्तिककुमार पांडेय यांनी प्रशासनाला गती देण्यासाठी तातडीने ही पद्धत कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना सूचना देखील दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता लवकरच या पद्धतीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.