औरंगाबाद : ७५ वर्षांत १५० वेळा ध्वजवंदन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Flag salute 150 times in 75 years

औरंगाबाद : ७५ वर्षांत १५० वेळा ध्वजवंदन!

औरंगाबाद : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा एनडीएसचे क्रीडा शिक्षक शशिकांत अनंत नीळकंठ हेदेखील आपल्या ध्वजवंदनाचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहेत. मागील ७५ वर्षांत त्यांनी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन मिळून १५० वेळा ध्वजवंदन केले. यात त्यांच्या हस्ते अनेकदा ध्वजवंदन झाले.

गुरुजी अशी ओळख असलेले शशिकांत अनंत नीळकंठ हे १५ ऑगस्ट १९४७ च्या पहिल्या स्वातंत्र्यदिनापासून ७५ वर्षांपासून ते स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला निरंतरपणे ध्वजवंदन, ध्वजारोहण करीत आले आहेत. वयाचे ८१ वर्षे पूर्ण करणाऱ्या नीळकंठ मास्तरांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ध्वजाला पहिली सलामी दिली होती. सांगोला (जि.सोलापूर) येथील जीवन शिक्षण मंदिर येथे ध्वजवंदन केल्याचे त्यांना चांगले आठवते.

याच शाळेत १९५३-५४ पर्यंत म्हणजे सातवीपर्यंत ध्वजवंदन केले. त्यानंतर १९५४ ते ५६ याकाळात सांगोला येथील विद्यामंदिर हायस्कूल, १९५६ ते १९५९ भारत हायस्कूल सतरंगीवाला चौक पुणे, १९६० एनडीएस प्रशिक्षण केंद्र, अल्वा राजस्थान, १९६१ ते १९६३ श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट, १९६४ ते १९६६ रा. स. चंडक हायस्कूल सोलापूर, १९६६ ते १९६७ जि.प. शासकीय हायस्कूल परसोडा औरंगाबाद, १९६७ ते १९७९ मौलाना आझाद हायस्कूल, १९७९ ते १९८१ शासकीय जिल्हा क्रीडा कार्यालय, १९८१ ते १९८७ शासकीय विद्यानिकेतन, १९८७ ते १९९३ श्री गुरुतेग बहादूर इंग्लिश हायस्कूल, १९९३ ते १९९७

जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद, १९९७ ते २००० दादोजी कोंडदेव हायस्कूल, राजे संभाजी सैनिक स्कूल, २००१ ते २०२२ : संस्कार प्रबोधिनी हायस्कूल औरंगाबादेत ध्वजवंदन केले. नीळकंठ मास्तरांनी नॅशनल डिसिप्लिन स्कीम (एनडीएस)चे ट्रेनिंग संपून पतियाळा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. पंजाबवरून अक्कलकोट त्यानंतर १९६७ ला औरंगाबादेत रुजू झाले. सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती आहे.

आझाद हिंद सेनेतही कार्य

नीळकंठ गुरुजींनी आझाद हिंद सेनेचे जनरल भोसले यांच्यासोबत काही काळ काम केले. आदर्श शिक्षक, क्रीडा संघटक, समाजभूषण, क्रीडारत्न अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण मिळवून देशसेवेत राहावे, यासाठी त्यांनी शहरात सैनिकी शाळा सुरू केली. विशेष म्हणजे मास्तरांना दोन मुली असताना तिसरी मुलगी दत्तक घेऊन तिचा संसार उभा करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Aurangabad Flag Salute 150 Times In 75 Years Independence Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..