Aurangabad : जो इतिहास विसरतो, त्याला अभिमान राहत नाही ; डॉ. अमोल कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अमोल कोल्हे

Aurangabad : जो इतिहास विसरतो, त्याला अभिमान राहत नाही ; डॉ. अमोल कोल्हे

औरंगाबाद : वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, त्यामुळे मुलांना इतिहास माहीत होत नाही. शाळकरी मुलांच्या मनात इतिहास रुजवणे काळाची गरज आहे. जो इतिहास विसरतो, त्याला त्याचा अभिमान राहत नाही. महाराजांचा इतिहास घराघरांत पोचविण्यासाठी ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या इतिहासाचा जागर सुरू केला आहे, असे राष्ट्रवादीचे खासदार तथा सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

औरंगाबादेत २३ ते २८ डिसेंबरदरम्यान महेंद्र महाडिक दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे जबिंदा ग्राऊंड येथे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.१२) या महानाट्याचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार संजय शिरसाट, महेंद्र महाडिक, राजेंद्र जबिंदा, प्रफुल्ल तावरे, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, गणेश जाधव, राजेंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, की २०१२ ला औरंगाबादेतून या महानाट्याची सुरुवात झाली होती. पहिलाच प्रयोग लोकांनी पावसात डोक्यावर खुर्च्या घेऊन पाहिला होता. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. त्यानंतर या महानाट्याची घोडदौड राज्यभर सुरू होती. त्यानंतर कोविडमुळे या नाट्याला ब्रेक लागला होता. कोविडनंतर या महानाट्याला तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा औरंगाबादेतून सुरुवात केली आहे. या महानाट्यासाठी १२० फुटी भव्य किल्ल्याचा रंगमंच, लढाईचा थरार, हत्ती, घोडे, बैलगाड्या, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, प्रत्यक्ष धडधडणाऱ्या तोफा, १५० हून अधिक कलाकार, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर या महानाट्यांच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी पत्रकार प‌रिषदेत दिली.