Aurangabad : हमारी दुर्लभ कश्यप गॅंग है, खत्म कर देंगे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाणामारी

Aurangabad : हमारी दुर्लभ कश्यप गॅंग है, खत्म कर देंगे!

औरंगाबाद : दुर्लभ कश्यप गॅंगचा प्रभाव असलेल्या चौघांच्या टोळक्याने शहरात डोके वर काढले आहे. ‘हमारी दुर्लभ कश्यप गॅंग है, तुम्हारे परिवार को खत्म कर देंगे’ म्हणत चौघांच्या टोळक्याने चाकू हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. ही घटना शनिवारी (ता. १७) पानचक्की परिसरातील एका टपरीसमोर घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद सूर्यवंशी, मयूर सूर्यवंशी, यश सिद्धार्थ बचके (रा. सर्व प्रबुद्धनगर, पानचक्की परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. यातील चौथा संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी जखमी जयेंद्र साळवे यांचे भाऊ रवींद्र गंगाधर साळवे (४३, रा. प्रबुद्धनगर) यांनी फिर्याद दिली. त्या‍नुसार, फिर्यादी हे निवडणूक बंदोबस्तकामी निवडणूक ग्राउंड येथे हजर असताना त्यांना मित्राने फोन करून त्यांचा भाऊ जयेंद्र यांच्या पाठीत चाकू भोसकला असून, त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. फिर्यादीने घाटी रुग्णालय गाठत जयेंद्रकडे चौकशी केली असता, विनोदचा अल्पवयीन मुलगा त्याचा मित्र यश बचके आणि जयेंद्रचा मुलगा हे रात्री लग्नामध्ये दारू पिले होते.

त्यामुळे जयेंद्रने मुलाला दारू पाजल्याच्या कारणावरून संशयिताच्या मुलासह यश बचकेला याचा जाब विचारला. त्यानंतर जयेंद्र हे पाणचक्की येथील एका पानटपरीवर गेले. तेथे विनोद सूर्यवंशी व त्याचा मुलगा मयूर हे चाकू घेऊन तेथे आले. ‘माझ्या मुलाला का मारले आणि ‘हमारी दुर्लभ कश्यप गॅंग है, तुम्हारे परिवार को खत्म कर देंगे’ म्हणत जयेंद्रच्या अंगावर विनोद चाकू घेऊन गेला. जयेंद्रने त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला असता मयूरने जयेंद्रला मारहाण सुरू केली. त्याचवेळी संशयिताचा अल्पवयीन मुलगा व यश बचके हे दुचाकीवर तेथे आले, अल्पवयीन मुलाने जयेंद्रच्याच पाठीत दोनवेळा चाकू भोसकला. गर्दी जमा झाल्याने आरोपींनी ते‍थून धूम ठोकली. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती/डगाळे यांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दुचाकी हस्तगगत करायची आहे. गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे काय, याचादेखील तपास बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली असता, पिता पुत्रासह तिघांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी दिले.