मुलगी निघून गेली अन् पित्यानेही प्राण सोडले | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या

औरंगाबाद : मुलगी निघून गेली अन् पित्यानेही प्राण सोडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लग्नाचे काही दिवसांआधीच मुलगी निघून गेल्याने हताश झालेल्या वडिलांनी संग्रामनगर उड्डाणपूल रेल्वेपटरीवर गाठत मालवाहू रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी (ता.१३) सायंकाळी घडली. विशेष म्हणजे हताश वडिलांनी आत्‍महत्‍येपूर्वी पत्नीला उद्देशून सुसाईड नोट लिहिली होती. त्‍यात प्रिय संगीता, मी तुम्हाला सोडून जात आहे. मुलीला आपल्या घरात घेऊ नको. मुलाचे चांगले लग्न लाव, संगीता, तुझी आठवण नेहमीच राहिल, असे नमूद करीत त्यांनी प्राण सोडले.

हेही वाचा: औरंगाबाद : कुकची प्रेयसीच्या घरात आत्महत्या

संजय खंडूजी वाकेकर (वय ४७, रा.महूनगर, बीड बायपास) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पत्नी संगीता, २२ वर्षीय मुलगा आणि १९ वर्षीय मुलगी यांच्यासह संजय हे महूनगर भागात राहात होते. ते चालक म्हणून काम करायचे. संगीताही मोलमजुरी करते. दरम्यान, वाकेकर यांच्‍या मुलीचे १९ नोव्‍हेंबर रोजी लग्न होते. त्‍यासाठी वाकेकर यांनी बीड बायपास भागातील एक मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नासाठीचा सर्व आहेर भरला होता. हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती.

मात्र, शनिवारी (ता.१३) सकाळी अचानक घरातून मुलगी कुठेतरी निघून गेली. यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरु केला. मात्र, शनिवारी संध्याकाळपर्यंत ती सापडली नाही. संध्याकाळी संजय वाकेकर हे दुचाकीची लिफ्ट घेऊन बायपासने गोदावरी टी पॉईंट पर्यंत आले. तेथून पायी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली पोहोचले. त्यानंतर कुठलाही विचार न करता रात्री सव्वाआठ वाजता मालवाहू रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी ही माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली. त्यांनी वाकेकर यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्‍यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार एस. जे. दाभाडे करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

loading image
go to top